फोटो सौजन्य - Social Media
एनटीपीसी माइनिंग लिमिटेडने (NTPC Mining Limited) एक्झिक्युटिव (Finance, Environmental Management) आणि असिस्टंट माईन सर्व्हेयर या पदांसाठी अधिकृत भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे एकूण 21 पदे भरली जाणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 27 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा ऑफलाइन अर्ज पाठवावा लागणार नाही, सर्व प्रक्रिया अधिकृत वेबसाइटवरूनच पूर्ण केली जाईल.
या भरतीसाठी पात्रतेच्या अटींनुसार, एक्झिक्युटिव (Finance) पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीसह CA किंवा CMA परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. एक्झिक्युटिव (Environmental Management) पदासाठी पर्यावरण विषयात किमान 60 टक्के गुणांसह इंजिनीअरिंग पदवी आवश्यक आहे. तर असिस्टंट माईन सर्व्हेयर पदासाठी माईन सर्व्हे, माईनिंग किंवा सिव्हिल इंजिनीअरिंग विषयातील डिप्लोमा पात्रतेसाठी आवश्यक आहे.
वयोमर्यादा विभागानुसार वेगवेगळी ठेवण्यात आली आहे. एक्झिक्युटिव (Finance) साठी कमाल वय 30 वर्षे, एक्झिक्युटिव (Environmental Management) साठी 35 वर्षे आणि असिस्टंट माईन सर्व्हेयरसाठी 40 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तसेच, OBC उमेदवारांना 3 वर्षे, SC/ST उमेदवारांना 5 वर्षे आणि दिव्यांग उमेदवारांना 10 वर्षांची सूट देण्यात येणार आहे. पगार संरचनेनुसार, एक्झिक्युटिव (Finance/Environmental Management) पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹71,000 इतका पगार मिळेल, तर असिस्टंट माईन सर्व्हेयर पदासाठी ₹60,000 प्रतिमाह वेतन मिळेल.
निवड प्रक्रिया CBT (Computer Based Test) च्या माध्यमातून पार पडेल. ही परीक्षा दोन भागांमध्ये विभागली गेली आहे. पहिल्या पेपरमध्ये उमेदवाराच्या संबंधित विषयावर आधारित 80 प्रश्न विचारले जातील, तर दुसऱ्या पेपरमध्ये सामान्य ज्ञान, तर्कशक्ती आणि डेटा इंटरप्रिटेशन या विषयांवर 40 बहुपर्यायी प्रश्न असतील. एकूण परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण वजा केले जातील.
इच्छुक उमेदवारांनी एनटीपीसीच्या अधिकृत संकेतस्थळाला www.ntpc.co.in भेट देऊन भरतीसंबंधी संपूर्ण अधिसूचना वाचावी आणि नमूद केलेल्या तारखांदरम्यान ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. अभियांत्रिकी आणि वित्त क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही उच्च पगाराची आणि स्थिर सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी ठरणार आहे.