फोटो सौजन्य - Social Media
वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी परदेशातील सुखसुविधा, आरामदायी जीवन आणि सर्व काही मागे सोडून भारतात परत आलेली सृष्टि मिश्रा ही आज देशातील अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे. साऊथ आफ्रिकेत शिक्षण घेतलेल्या सृष्टि यांनी वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी यूपीएससीची वाट निवडली. पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश आले, मात्र त्यांनी हार मानली नाही. दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी अखिल भारतीय स्तरावर 95वा क्रमांक मिळवत IPS अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.
सृष्टिचे वडील परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात अंडर सेक्रेटरी म्हणून कार्यरत असून त्यांची बदली साऊथ आफ्रिकेत झाली होती. त्यामुळे सृष्टिचं शिक्षण परदेशातच झालं. परंतु, भारतात येऊन वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यूपीएससीसारखी कठीण परीक्षा पार करण्यासाठी त्यांनी दिवस-रात्र मेहनत घेतली.
अपयशानंतरच्या काळाबद्दल सृष्टि सांगतात, “पहिल्या प्रयत्नात अपयश आलं तेव्हा मनात खूप प्रश्न आले, पण त्या काळात स्वतःवर विश्वास ठेवणं आणि सकारात्मक राहणं हेच माझं सर्वात मोठं बळ ठरलं.” त्या अपयशाला अडथळा न मानता त्यांनी त्याचं रूपांतर शिकवणीत केलं आणि दुगणी मेहनत घेत पुन्हा प्रयत्न केला. सृष्टिच्या यशामागे त्यांच्या वडिलांचे मार्गदर्शन आणि कुटुंबाचा ठाम विश्वास होता. त्यांच्या घरात शिक्षणाला नेहमीच विशेष स्थान आहे. सृष्टि म्हणतात, “वडिलांनी नेहमी शिकवलं की स्वप्न कितीही मोठं असलं तरी प्रयत्न थांबवू नयेत.” आज त्या आपल्या चिकाटी, जिद्द आणि आत्मविश्वासामुळे देशातील असंख्य युवांसाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत.
अशा प्रकारे करा UPSC ची तयारी:
UPSC ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते, पण योग्य नियोजन, चिकाटी आणि सातत्याने अभ्यास केल्यास यश मिळवणे शक्य आहे. सर्वप्रथम, अभ्यासाचा ठोस आराखडा तयार करा आणि विषयानुसार वेळेचे व्यवस्थापन शिका. प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करा, नोट्स बनवा आणि नियमित पुनरावलोकन करा. चालू घडामोडींसाठी रोज वर्तमानपत्र वाचा आणि सरकारी संकेतस्थळांवरील अहवालांचा अभ्यास करा. मॉक टेस्ट आणि मागील प्रश्नपत्रिकांवर सराव करा, त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. अपयश आल्यास निराश न होता अनुभवातून शिका, कारण UPSC फक्त ज्ञानाची नाही, तर संयम आणि मानसिक ताकदीचीही परीक्षा असते.