फोटो सौजन्य - Social Media
आजच्या काळात करिअरच्या बाबतीत तरुणांकडे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. डॉक्टर, इंजिनिअर, वकील किंवा पायलट यापुरताच विचार मर्यादित न राहता ते वेगळ्या आणि हटके क्षेत्रांमध्ये करिअर करत आहेत. डिजिटल क्रांती, नवी तंत्रज्ञानं आणि बदलत्या समाजाच्या गरजा लक्षात घेऊन अनेक ऑफबीट करिअर विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होत आहेत.
डिजिटल डिटॉक्स कन्सल्टंट हा त्यापैकीच एक नवा पर्याय आहे. हे लोक लोकांना स्क्रीन टाइम कमी करण्यास, मानसिक शांतता मिळविण्यास आणि निरोगी जीवनशैली अंगीकारण्यास मदत करतात. मानसशास्त्र किंवा हेल्थ मॅनेजमेंटचे शिक्षण असलेले विद्यार्थी यात करिअर करू शकतात.
फॉरेन्सिक लिंग्विस्ट हे भाषेचा अभ्यास करून गुन्हे शोधण्यासाठी मदत करतात. टेक्स्ट किंवा संभाषणाच्या आधारे लेखक कोण, त्याचा उद्देश काय हे ते शोधतात. त्यांना पोलिस, न्यायालय आणि लॉ फर्ममध्ये मोठी संधी असते. चहा चाखणारा टी टेस्टर हा अजून एक आकर्षक व्यवसाय आहे. चहाची गुणवत्ता, सुवास आणि नवे फ्लेवर तयार करण्याचे काम ते करतात. कृषीशास्त्र किंवा फूड सायन्ससह टी मॅनेजमेंटचे डिप्लोमा यात मदत करतो.
नव्या पिढीतील एआर आणि व्हीआर डिझाइनर्स गेम्स, ट्रेनिंग प्रोग्राम आणि चित्रपटांसाठी आभासी जग तयार करतात. संगणकशास्त्र व मल्टिमीडिया पदवीसह या क्षेत्रात उत्तम संधी आहेत. शहरी शेतीही वेगाने वाढत आहे. छतांवर किंवा मोकळ्या जागेत भाज्या, फळं पिकवून ऑर्गेनिक उत्पादन विक्री, कन्सल्टन्सी किंवा स्टार्टअप सुरू करता येतो.
पेट ग्रूमिंग हे प्राण्यांवर प्रेम असणाऱ्यांसाठी उत्तम क्षेत्र आहे. पाळीव प्राण्यांची देखभाल, केस व नखांची निगा राखणे अशा सेवांना चांगली मागणी आहे. ड्रोन पायलटिंग आज खूप लोकप्रिय झाले आहे. कृषी, लग्नसोहळे, सिनेमा, नकाशे तयार करणे, वन्यजीव संवर्धन अशा विविध कामांमध्ये ड्रोन पायलट्सना संधी आहे. या सर्व करिअरमध्ये मेहनत आणि योग्य प्रशिक्षण घेतल्यास केवळ चांगली कमाईच नाही तर समाधान व आनंदही मिळतो. त्यामुळे जर तुम्हाला काहीतरी हटके करायचे असेल, तर या करिअरपैकी एखादा पर्याय नक्कीच निवडू शकता.