फोटो सौजन्य - Social Media
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय) मार्फत स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण मिळावे, यासाठी संपूर्ण प्रक्रिया वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे लाभार्थी विद्यार्थ्यांची निवड आणि प्रशिक्षण संस्था ठरवण्यासाठी तात्काळ वेळापत्रक तयार करण्यात यावे, असे आदेश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले आहेत. मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत डॉ. वुईके यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या कार्यपद्धतीचा आढावा घेण्यात आला. यावेळी आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, टीआरटीआयचे आयुक्त समीर कुर्तकोटी तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत डॉ. वुईके यांनी स्पष्ट केले की, प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या संस्थांची कार्यक्षमता आणि गुणवत्ता विशेष पथकाच्या माध्यमातून तपासली जावी. केवळ कागदोपत्री माहिती न तपासता प्रत्यक्ष भेट देऊन संस्थांची पारदर्शक मूल्यांकन करावे. प्रशिक्षण अभ्यासक्रमात आवश्यक बदल करून नवनवीन कोर्सेस समाविष्ट करावेत, जे स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील.
त्याचबरोबर, पेसा क्षेत्रातील सरपंच, उपसरपंच, आदिवासी सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांच्यासाठी विविध विषयांवर प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात याव्यात. हे प्रशिक्षण क्षेत्रीय विकास व नेतृत्व निर्माणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे. आदिवासी समाजाच्या संस्कृती, बोलीभाषा आणि परंपरांचे जतन व्हावे, यासाठी दृकश्राव्य माध्यमातून संकलन केले जावे, अशी सूचना त्यांनी केली. विशेषतः आदिवासी समाजातील क्रांतिकारकांची चरित्रे स्थानिक बोलीभाषेत लिहिली जावीत व त्याचे साहित्य स्वरूपात रूपांतर करावे.
धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत गावांचे आराखडे तयार करण्यासाठी लागणारा निधी सरकारकडून उपलब्ध करून दिला जाईल, अशी हमीही मंत्री डॉ. वुईके यांनी यावेळी दिली. या सर्व उपक्रमांमुळे आदिवासी युवकांना अधिक चांगले शिक्षण, मार्गदर्शन आणि रोजगाराच्या संधी मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.