फोटो सौजन्य - सोशल मिडिया
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) या महारत्न दर्जाच्या सरकारी कंपनीने फिल्ड इंजिनिअर व फिल्ड सुपरवायझर या पदांसाठी मोठी कराराधिष्ठित भरती जाहीर केली आहे. जाहिरात क्र. CC/03/2025 (दि. 27 ऑगस्ट 2025) अंतर्गत या भरतीची घोषणा करण्यात आली असून, निवड प्रक्रिया POWERGRID Common FTE Written Test 2025 च्या माध्यमातून होणार आहे. एकूण 1543 रिक्त पदं या भरतीत उपलब्ध असून त्यामध्ये इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन या शाखांचा समावेश आहे. निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला 24 महिन्यांचा करार देण्यात येईल, मात्र प्रकल्पाच्या आवश्यकतेनुसार हा कालावधी 5 वर्षांपर्यंत वाढवता येईल. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 सप्टेंबर 2025 आहे.
या पदांसाठी फिल्ड इंजिनिअर पदाच्या अर्जदारांकडून B.E./B.Tech./B.Sc. (Engg.) पदवी किमान 55% गुणांसह आवश्यक आहे, तसेच किमान 1 वर्षाचा संबंधित अनुभव हवा. फिल्ड सुपरवायझर पदांसाठी इलेक्ट्रिकल/सिव्हिल/EC/IT मध्ये डिप्लोमा (किमान 55% गुणांसह) आवश्यक असून, B.E./B.Tech. पदवीधरांना या पदासाठी पात्रता नाही. याशिवाय 1 वर्षाचा अनुभव असणे बंधनकारक आहे. अर्जदारांचे वय 17 सप्टेंबर 2025 रोजी 29 वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षणानुसार OBC उमेदवारांना 3 वर्षे, SC/ST उमेदवारांना 5 वर्षे, तर PwBD उमेदवारांना 10 ते 15 वर्षांची शिथिलता देण्यात येईल. अर्ज फी : फिल्ड इंजिनिअर साठी ₹400 व फिल्ड सुपरवायझर साठी ₹300 असून, SC/ST/PwBD/ExSM उमेदवारांना फी माफी आहे.
निवड प्रक्रिया पदानुसार वेगवेगळी असेल. फिल्ड इंजिनिअर पदासाठी लेखी परीक्षा आणि मुलाखत या दोन टप्प्यात निवड केली जाणार असून अंतिम निवड मुलाखतीतील कामगिरीवर होईल. तर फिल्ड सुपरवायझर पदासाठी फक्त लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम मेरिट ठरणार आहे. परीक्षेत पात्र होण्यासाठी UR/EWS उमेदवारांना किमान 40% व राखीव प्रवर्गातील उमेदवारांना किमान 30% गुण मिळणे आवश्यक आहे. परीक्षेचा कालावधी 1 तास असून प्रश्नपत्रिका MCQ प्रकारातील असेल आणि निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही. प्रश्नपत्रिकेत दोन विभाग असतील : (1) तांत्रिक ज्ञान – 50 प्रश्न आणि (2) अप्टिट्यूड चाचणी – 25 प्रश्न ज्यामध्ये इंग्रजी, रिझनिंग, गणित व चालू घडामोडी यांचा समावेश असेल. ही परीक्षा हिंदी किंवा इंग्रजी या भाषेत देता येईल.
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून इच्छुक उमेदवारांनी [www.powergrid.in → Careers → Job Opportunities → Executive Positions → Engagement of Field Engineer/Field Supervisor] या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. अर्जदारांकडे वैध ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. तसेच फोटो, सही, शैक्षणिक पात्रतेची व अनुभवाची कागदपत्रे अपलोड करावी लागतील. अर्ज फी देखील डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून भरावी लागेल. ही भरती अभियांत्रिकी पदवीधर व डिप्लोमा धारकांसाठी PGCIL च्या प्रतिष्ठित राष्ट्रीय प्रकल्पांमध्ये सहभागी होऊन करिअर घडवण्याची एक उत्तम संधी आहे.