फोटो सौजन्य - Social Media
सरकारी संक्षेत्रात नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. उमेदवारांना लवकरच भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. भारत सरकारच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात (CPCB) ग्रुप A, B आणि C श्रेणीत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र व इच्छुक उमेदवार cpcb.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर 28 एप्रिल 2025 पूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. यानंतर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
या भरतीद्वारे वैज्ञानिक ‘बी’, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, सहाय्यक, तांत्रिक पर्यवेक्षक, अप्पर व लोअर डिवीजन क्लर्क, स्टेनोग्राफर, मल्टी टास्किंग स्टाफ, फील्ड असिस्टंट, कनिष्ठ तंत्रज्ञ, कनिष्ठ व वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, सहाय्यक विधी अधिकारी, कनिष्ठ अनुवादक, वरिष्ठ ड्राफ्ट्समन, डाटा एंट्री ऑपरेटर अशा एकूण 69 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. काही पदांसाठी 10वी किंवा 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तर काही पदांसाठी इंजिनिअरिंग, टेक्नोलॉजी, लॉ, सिव्हिल किंवा मेकॅनिकल शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. काही पदांसाठी अनुभव व टायपिंग स्पीड अनिवार्य आहे.
वयोमर्यादाही पदानुसार भिन्न असून, UDC, LDC, स्टेनोग्राफर, ज्युनियर टेक्निशियन अशा पदांसाठी 18 ते 27 वर्षे वयोमर्यादा आहे, तर इतर काही पदांसाठी 30 ते 35 वर्षे वयोमर्यादा लागू आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सवलत दिली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना पदाच्या स्वरूपानुसार ₹18,000 ते ₹1,77,500 पर्यंत वेतन दिलं जाईल.
या भरतीसाठी निवड प्रक्रिया चार प्रमुख टप्प्यांमध्ये पार पडणार आहे – लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी (Skill Test), कागदपत्रांची पडताळणी (Document Verification) आणि शेवटी वैद्यकीय चाचणी (Medical Examination). प्रत्येक टप्पा उमेदवाराच्या पात्रतेची व गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी महत्त्वाचा आहे. लेखी परीक्षेनंतर पात्र उमेदवारांना त्यांच्या पदाच्या गरजेनुसार कौशल्य चाचणीस बोलावले जाईल. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी होईल आणि शेवटी वैद्यकीय चाचणीनंतर अंतिम निवड निश्चित केली जाईल.
अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क पदानुसार वेगळं आहे. दोन तासांच्या परीक्षेसाठी सामान्य व खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ₹1000 शुल्क भरावं लागेल, तर एका तासाच्या परीक्षेसाठी ₹500 शुल्क आहे. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), महिला आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी सवलत देण्यात आली आहे. त्यांच्यासाठी दोन तासांच्या परीक्षेसाठी ₹250 आणि एका तासाच्या परीक्षेसाठी ₹150 इतकं शुल्क आकारण्यात येणार आहे. परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरता येईल. भरती प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आरक्षण नियम तसेच इतर अटी व शर्ती याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी कृपया अधिकृत वेबसाईट [cpcb.nic.in](http://cpcb.nic.in) वरील अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. चुकीची माहिती देणे अथवा अपूर्ण अर्ज सादर करणे यामुळे अर्ज फेटाळला जाऊ शकतो, त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी.