फोटो सौजन्य - Social Media
मिरा-भाईंदर महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणावर पदभरती जाहीर केली असून, ३५८ जागांसाठी सरळ सेवा पद्धतीने भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या भरतीसंदर्भातील अधिकृत जाहिरात २१ ऑगस्ट २०२५ रोजी प्रसिद्ध झाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना २२ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०२५ या कालावधीत महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mbmc.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज दाखल करता येतील. ही भरती गट-क संवर्गातील विविध पदांसाठी असून, उमेदवारांकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता व निर्धारित अटींची पूर्तता असणे बंधनकारक आहे.
या भरतीत विविध पदांचा समावेश असून त्यात कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) २७, कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल) २, कनिष्ठ अभियंता (विद्युत) १, लिपिक-टंकलेखक ३, सर्वेक्षक २, प्लंबर २, फिटर १, मिस्त्री २, पंपचालक ७, अनुरेखक १, इलेक्ट्रिशियन १, कनिष्ठ अभियंता (सॉफ्टवेअर/प्रोग्रामर) १, स्वच्छता निरीक्षक ५, चालक-यंत्रचालक १४, सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी ६, अग्निशामक २४१, उद्यान अधीक्षक ३, लेखापाल ५, डायलिसिस तंत्रज्ञ ३, बालवाडी शिक्षिका ४, परिचारिका/अधीपरिचारिका ५, प्रसविका १२, औषध निर्माता/अधिकारी ५, लेखापरीक्षक १, सहाय्यक विधी अधिकारी २, तारतंत्री (वायरमेन) १ आणि ग्रंथपाल १ अशा पदांचा समावेश करण्यात आला आहे.
भरती प्रक्रियेत खुल्या प्रवर्गासह मागासवर्गीय उमेदवार, अनाथ, प्राविण्यप्राप्त खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग व्यक्ती तसेच पदवीधर अंशकालीन, प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त उमेदवारांनाही अर्जाची संधी उपलब्ध आहे.या संपूर्ण भरती प्रक्रियेची जबाबदारी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) यांच्याकडे देण्यात आली असून, अर्ज स्वीकृतीपासून निवड प्रक्रियेपर्यंतची सर्व कामे त्यांच्याच माध्यमातून पार पडणार आहेत.
दरम्यान, महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी नागरिकांना सूचना केली आहे की, या भरती प्रक्रियेत कुणी नोकरी लावून देण्याच्या आमिषाने पैसे मागत असल्यास त्याला बळी पडू नये. अशा प्रकारची माहिती त्वरित स्थानिक पोलीस ठाणे किंवा महानगरपालिकेला कळवावी, त्यावर कठोर कारवाई केली जाईल. त्यामुळे इच्छुक तरुणांना मिरा-भाईंदर महानगरपालिकेत पारदर्शक व कायदेशीर मार्गाने स्थिर नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे.