
मोठी बातमी ! राज्यात 30 हजार शिक्षकांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात; शिक्षण आयुक्तांची माहिती
मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील शिक्षण सेवक व शिक्षक पदांची भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शक आणि गुणवत्ताधारित पद्धतीने करण्यात येत आहे. यासाठी राज्यभरातील ३०२०९ रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी ही माहिती दिली.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी)-२०२५ ही ऑनलाईन पद्धतीने २७ मे ते ५ जून २०२५ या काळात घेण्यात आली होती. या चाचणीसाठी २ लाख २८ हजार ८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ११ हजार ३०८ उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले. त्यातील १ लाख ७० हजार १०८ उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण केली आहे.
पसंतीक्रम 11 पर्यंत लॉक करावा
पदभरतीसाठी संकेतस्थळावर प्राधान्यक्रम निश्चित करण्याच्या सूचना उमेदवारांना देण्यात आल्या आहेत. त्यांती पदनिहाय पसंतीक्रम नोंदवून ११ ऑगस्टपर्यंत लॉक करणे आवश्यक आहे. त्यानंतर मुलाखतीशिवायच्या पदांसाठी गुणवत्तायादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. भरती प्रक्रियेशी संबंधित सूचना, मागण्या किंवा तक्रारी उमेदवारांनी edupavitra25@gmail.com या ई-मेलवर पाठविण्याचे शालेय शिक्षण आयुक्तांचे आवाहन आहे.
गोंदिया जिल्ह्यात तब्बल २८८ ‘एक शिक्षकी’ शाळा
राज्यात २०११ पासून शिक्षक भरतीवर असलेली बंदी २०१९ मध्ये उठविण्यात आली. मात्र, त्यानंतर तब्बल सहा वर्षे उलटूनही नियमित शिक्षक भरती न झाल्याने जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ९१० शिक्षकांची पदे अद्याप रिक्त आहे. याशिवाय जिल्ह्यातील तब्बल २८८ शाळा एकाच शिक्षकाच्या भरवशावर सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असून, पालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली.
अकोला जिल्ह्यात 15 एक शिक्षकी शाळा
ग्रामीण भागातील शाळांची पटसंख्या टिकविण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविले जात असताना अकोला जिल्ह्यात एक वेगळेच चित्र समोर आले आहे. जिल्ह्यात ४२ शिक्षक अतिरिक्त ठरत असतानाही तब्बल १५ शाळा अद्याप एक शिक्षकी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.