
फोटो सौजन्य - Social Media
भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (SEBI) ने देशभरातील तरुण पदवीधर आणि पदव्युत्तर उमेदवारांसाठी मोठी संधी जाहीर केली आहे. सेबीमार्फत ऑफिसर ग्रेड A (Assistant Manager) भरती 2025 साठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती भारतातील प्रतिष्ठित वित्तीय नियामक संस्थेत अधिकारी म्हणून करिअर घडविण्याची उत्कृष्ट संधी ठरणार आहे. या भरतीत जनरल, लीगल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, रिसर्च, ऑफिसियल लँग्वेज, तसेच इंजिनिअरिंग (इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल) या विविध विभागांमध्ये एकूण 110 पेक्षा जास्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 30 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झाली आहे आणि 28 नोव्हेंबर 2025 ही शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. यासाठी सेबीच्या अधिकृत संकेतस्थळावर https://www.sebi.gov.in भेट देऊन अर्ज करता येईल. अर्ज सादर करण्यापूर्वी अधिसूचना नीट वाचून पात्रतेचे सर्व निकष तपासणे आवश्यक आहे. प्राथमिक परीक्षा 10 जानेवारी 2026 रोजी तर मुख्य परीक्षा 21 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात येईल. प्राथमिक आणि मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना नंतर मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क ₹1180 इतके आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि दिव्यांग उमेदवारांसाठी हे शुल्क फक्त ₹118 इतके ठेवण्यात आले आहे. शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल आणि डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेटबँकिंग किंवा यूपीआय यांचा वापर करता येईल.
सेबी ग्रेड A भरतीत विविध प्रवर्गांनुसार वेगवेगळ्या पात्रता निश्चित करण्यात आल्या आहेत. जनरल प्रवर्गासाठी कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी, दोन वर्षांचा पीजी डिप्लोमा, कायद्यातील पदवी, अभियांत्रिकी पदवी किंवा CA, CFA, CS किंवा CMA पात्रता आवश्यक आहे. लीगल प्रवर्गासाठी उमेदवारांकडे कायद्यातील पदवी असावी आणि दोन वर्षांचा वकील म्हणून अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रवर्गासाठी कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी पदवी किंवा संगणकशास्त्र आणि आयटीमधील पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. रिसर्च प्रवर्गासाठी अर्थशास्त्र, वाणिज्य, वित्त, सांख्यिकी किंवा डेटा सायन्स विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा दोन वर्षांचा पीजी डिप्लोमा आवश्यक आहे. ऑफिशियल लँग्वेज प्रवर्गासाठी हिंदी किंवा हिंदी भाषांतर विषयातील पदव्युत्तर पदवी (इंग्रजीसह) किंवा इंग्रजी, संस्कृत किंवा अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी आणि पदवी स्तरावर हिंदी विषय असावा. इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीसाठी इलेक्ट्रिकल शाखेतील पदवी आणि सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी सिव्हिल शाखेतील पदवी आवश्यक आहे.
उमेदवाराचे वय 30 सप्टेंबर 2025 रोजी 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म 1 ऑक्टोबर 1995 नंतर झालेला असावा. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र शासनाच्या नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
या भरतीसाठी निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत पार पडेल. पहिल्या टप्प्यात दोन पेपर्स असलेली ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा प्राथमिक स्वरूपाची असेल. दुसऱ्या टप्प्यात आणखी दोन पेपर्स असलेली मुख्य परीक्षा होईल, ज्यामध्ये विषयावर अधिक सखोल ज्ञान आणि विश्लेषण क्षमतेची चाचणी घेतली जाईल. तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात मुलाखत होईल. परीक्षांमधील आणि मुलाखतीतील एकूण गुणांवर उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.
सेबीतील ऑफिसर ग्रेड A पदासाठी मूल वेतन ₹62,500 पासून सुरू होते आणि ते कालांतराने ₹1,26,100 पर्यंत वाढते. निवास सुविधा नसल्यास एकूण मासिक वेतन ₹1,84,000 पर्यंत जाऊ शकते, तर निवास सुविधा असल्यास हे वेतन ₹1,43,000 असेल याशिवाय, भाडेभत्ता, वैद्यकीय सुविधा, प्रवास भत्ता, शिक्षण भत्ता, लीव्ह ट्रॅव्हल कंसेशन, पगारवाढ, आणि निवृत्ती लाभ यांसारखे शासकीय लाभही दिले जातात. सेबीमध्ये नोकरी मिळाल्यास केवळ स्थिर वेतनच नव्हे, तर व्यावसायिक प्रगती, परदेशी प्रशिक्षण, आणि वित्तीय क्षेत्रातील प्रतिष्ठित अनुभव मिळतो.
भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ म्हणजेच SEBI ही भारत सरकारची वित्तीय नियामक संस्था आहे. तिची स्थापना 1988 साली झाली आणि 1992 मध्ये सेबी कायद्याद्वारे तिला वैधानिक अधिकार मिळाला. सेबीचे मुख्य कार्य म्हणजे गुंतवणूकदारांचे हितसुरक्षण करणे, शेअर बाजाराचे नियमन करणे आणि बाजारात पारदर्शकता राखणे. या संस्थेत अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळणे म्हणजे देशाच्या आर्थिक व्यवस्थेत थेट योगदान देण्याची संधी आहे.
सेबीच्या अधिकृत संकेतस्थळावर https://www.sebi.gov.in भेट द्यावी. तिथे “Careers” किंवा “Recruitment” या विभागात जाऊन SEBI Grade A 2025 Notification वर क्लिक करावे. अर्ज फॉर्म भरताना सर्व माहिती अचूकपणे भरावी आणि आवश्यक कागदपत्रे — शैक्षणिक प्रमाणपत्रे, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि सही, अपलोड करावीत. शुल्क ऑनलाईन भरल्यानंतर अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट आउट प्रत भविष्यातील संदर्भासाठी जपून ठेवावी.
सेबीमध्ये अधिकारी म्हणून काम करण्याची संधी म्हणजे केवळ उच्च पगार आणि सुविधा नव्हे, तर सन्मान, सुरक्षितता आणि करिअर प्रगतीचा मार्गही आहे. वित्त, कायदा, आयटी, अभियांत्रिकी, किंवा भाषाशास्त्र या कोणत्याही क्षेत्रातील पात्र उमेदवारांसाठी ही भरती सुवर्णसंधी ठरू शकते. इच्छुक उमेदवारांनी उशीर न करता 28 नोव्हेंबर 2025 पूर्वी अर्ज सादर करून ही प्रतिष्ठित संधी साधावी.