फोटो सौजन्य - Social Media
सरकारी बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI) ने ग्रेड A आणि ग्रेड B ऑफिसर पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर केली आहे. एकूण 76 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात असून, यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 14 जुलै 2025 पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना 11 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
ग्रेड A ऑफिसर पदासाठी एकूण 50 जागा तर ग्रेड B साठी 26 जागा आरक्षित आहेत. ही भरती जनरल तसेच स्पेशालिस्ट स्ट्रीमसाठी केली जाणार आहे. पात्रता म्हणून उमेदवारांकडे B.A, B.Com, B.Sc, BBA, B.E, LLB किंवा CS, CA, MBA, PGDM यापैकी कोणतीही मान्यताप्राप्त शैक्षणिक पदवी असणे आवश्यक आहे. वयोमर्यादेच्या दृष्टीने ग्रेड A साठी उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षे असावे लागेल, तर ग्रेड B साठी 25 ते 33 वर्षांच्या दरम्यान असणे अपेक्षित आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयात सवलत दिली जाणार आहे. वयाची गणना 14 जुलै 2025 या तारखेनुसार केली जाईल.
अर्ज करण्याची प्रक्रिया: उमेदवारांनी SIDBI च्या अधिकृत वेबसाइट www.sidbi.in वर जाऊन ‘Recruitment’ विभागात दिलेल्या अर्ज लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर ‘Click here for New Registration’ वर जाऊन आपली मूलभूत माहिती भरावी, फोटो, स्वाक्षरी व आवश्यक दस्तऐवज अपलोड करून अर्ज सादर करावा.
अर्ज शुल्क: सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी अर्ज शुल्क ₹1100 असून, अनुसूचित जाती, जमाती व दिव्यांग उमेदवारांसाठी हे शुल्क ₹175 आहे. पेमेंट डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून करता येणार आहे.
महत्त्वाची टीप: अर्ज करताना सर्व माहिती अचूकपणे भरावी कारण एकदा अर्ज सादर केल्यावर त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. ही संधी मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी वेळ न दवडता लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.