
फोटो सौजन्य - Social Media
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत विवा महाविद्यालयाच्या बीएएमएमसी विभागातर्फे द्वारकाधीश मंदिर परिसरात सीड बॉल व वृक्षारोपण उपक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात १०२ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत जांभूळ, चिकू, आंबा, फणस आदी विविध फळझाडांच्या १०२ बियांचे रोपण केले. विद्यार्थ्यांनी निसर्गालाच गुरू मानत पर्यावरण रक्षणाची सामूहिक शपथ घेत परिसर हरित करण्याचा संकल्प केला.
या उपक्रमाला वसई-विरार महानगरपालिकेच्या प्रथम महिला महापौर प्रविणाताई हितेंद्र ठाकूर तसेच संस्थेचे खजिनदार शिखर हितेंद्रजी ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक करत प्रत्येकाने केवळ वृक्षलागवड न करता त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारीही स्वीकारावी, असे आवाहन प्रविणाताई ठाकूर यांनी केले. त्यांनी अशा उपक्रमांमुळे तरुणांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण होत असल्याचेही नमूद केले.
बीएएमएमसी विभाग प्रमुख शाहीन महिडा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रा. मोहसीन शेख यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये प्रा. तृप्ती पाटील, डॉ. एलिना गोंसालविस, प्रा. रुकसार शेख, प्रा. महेश जगताप, प्रा. प्रवीण पाटील, प्रा. बाळकृष्ण अईर यांच्यासह विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी सीड बॉल तयार करून त्यांचे रोपण करत पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्यक्ष कृतीतून योगदान दिले.
गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर आयोजित या उपक्रमातून पर्यावरण संरक्षण, सामाजिक बांधिलकी आणि विद्यार्थी सहभागाचा अनोखा संगम पाहायला मिळाला. भविष्यातही अशा हरित उपक्रमांद्वारे समाजात पर्यावरण संरक्षणाचा संदेश पोहोचविण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयीची जाणीव अधिक दृढ करणारा आणि समाजासाठी प्रेरणादायी ठरला.
या उपक्रमासाठी विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हितेंद्रजी ठाकूर, संस्थेच्या सेक्रेटरी अपर्णा ठाकूर, व्यवस्थापन समितीचे सदस्य संजीव पाटील, संजय पिंगुळकर, एस. एन. पाध्ये, विवा महाविद्यालयाचे समन्वयक नारायण कुट्टी, उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे आणि प्रभारी प्राचार्या डॉ. दीपा वर्मा यांनी मोलाचे सहकार्य केले.