
फोटो सौजन्य - Social Media
राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर सुरू असलेल्या या उपक्रमाचे प्रशिक्षण भारतातील प्रसिद्ध कमांडो ट्रेनर आणि स्वसंरक्षण तज्ज्ञ शिफूजी शौर्य भारद्वाज देत आहेत. विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी प्रत्यक्ष वापरता येतील अशा तंत्रांचा समावेश असलेल्या या प्रशिक्षणामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास आणि सजगता निर्माण होत असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
दिवसाच्या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अधीक्षक अभियंता अनिल पवार, अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, राजेश इंगळे, संजय बागडे, तसेच प्रशासन आणि पोलीस विभागातील इतर मान्यवर अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत स्व-संरक्षणाची गरज, महिलांची सुरक्षितता आणि मानसिक तयारीचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमात उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
मुख्य आकर्षण ठरले ते शिफूजी शौर्य भारद्वाज यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण. त्यांनी विद्यार्थिनींना ओळखपत्र, हातातील बांगडी, केसांतील कौल, क्लिप्स, पुस्तके अशी दैनंदिन वापरातील साधी वस्तूही स्व-संरक्षणासाठी कशी वापरता येतात याची व्यावहारिक प्रात्यक्षिके दिली.
त्यांनी केवळ स्वसंरक्षण तंत्रच नव्हे, तर परिस्थितीशी लढण्याची मानसिक तयारी, धोका ओळखण्याची क्षमता आणि सतर्क राहण्याचे महत्त्व विद्यार्थिनींना समजावून सांगितले.
पहिल्या दिवसापेक्षा अधिक विद्यार्थिनी दुसऱ्या दिवशी उपस्थित होत्या. विविध शाळांतील मुलींनी उत्साहाने तंत्र आत्मसात केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण विस्तार अधिकारी रंजना धिवरे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी केले. प्रशासन, पोलीस विभाग, शिक्षण विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी, तसेच अनेक शिक्षक आणि शालेय कर्मचारी प्रशिक्षणासाठी उपस्थित होते.
वीरांगना प्रशिक्षणामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास, संकटप्रसंगी स्वतःचा बचाव करण्याची वृत्ती आणि धैर्य निर्माण होत असल्याने शाळा–महाविद्यालयांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनाही या उपक्रमाचा लाभ होत असल्याने हा कार्यक्रम जिल्ह्यातील महिला सुरक्षेसाठी प्रभावी ठरत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.