फोटो सौैजन्य - Social Media
देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक म्हणून ओळखली जाणारी UPSC परीक्षा दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांना आकर्षित करते. पण या परीक्षेत यश मिळवणं प्रत्येकाच्या नशिबात नसतं. प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू अशा तीन टप्प्यांतून यशस्वी होऊनच उमेदवार अधिकारी बनतो. अशाच परीक्षेच्या प्रवासात यशस्वी ठरलेली एक तरुणी म्हणजे IPS आशना चौधरी. IAS सेवा मिळूनही त्यांनी IPS होण्याचं स्वप्न निवडलं.
उत्तर प्रदेशमधील हापुड जिल्ह्यातील पिलखुवा गावात राहणाऱ्या आशना चौधरी यांचं शिक्षणप्रेमी कुटुंब आहे. त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य प्राध्यापक आहेत. त्यामुळे त्या स्वतःला “PhD फॅमिली”चा भाग मानतात. त्यांच्या वडिलांना शासकीय सेवेमध्ये खूप रस होता आणि त्यांच्याच प्रेरणेमुळे आशनाने UPSC परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.
आशनाचं शिक्षण गाझियाबादमधून बारावीपर्यंत झालं, ज्यात त्यांनी ह्युमॅनिटीज (मानविकी) विषय निवडला. पुढे दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून इंग्रजी साहित्यात ऑनर्स केलं. त्यानंतर त्यांनी 2023 मध्ये दक्षिण आशियाई विद्यापीठ (South Asian University), दिल्ली येथून आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. UPSC परीक्षेचा प्रवास तसा सोपा नव्हता. त्यांनी पदवी पूर्ण केल्यानंतर तयारी सुरू केली. पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये त्यांना यश मिळालं नाही, पण त्यांनी हार मानली नाही. अखेर 2023 मध्ये तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी ऑल इंडिया रँक 116 (AIR 116) मिळवून यश मिळवलं.
यशस्वी झाल्यानंतर त्यांना IAS सेवा मिळाली होती. पण आशना यांचं खऱ्या अर्थानं स्वप्न होतं ते IPS बनण्याचं. त्यामुळे IAS जरी मिळालं असलं, तरी त्यांनी स्वतःहून IPS सेवा निवडली. हेच त्यांच्या ध्येयस्थिरतेचं उदाहरण आहे. जेव्हा लक्ष्य ठरलेलं असतं, तेव्हा निर्णय घेणं सोपं होतं. त्यांची ही जिद्द, चिकाटी आणि स्वतःच्या आवडीनुसार घेतलेला निर्णय UPSC तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी प्रेरणादायक ठरतो आहे.