फोटो सौजन्य - Social Media
दरवर्षी लाखो विद्यार्थी UPSC सिव्हिल सर्व्हिस परीक्षा देतात, पण काहीच जण पहिल्याच प्रयत्नात यश मिळवतात. अशा दुर्मिळ यशस्वी उमेदवारांपैकी एक आहेत सिमाला प्रसाद, ज्यांनी 2010 साली पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि संपूर्ण देशात 51वा क्रमांक मिळवला. त्यांची निवड इंडियन पोलिस सर्व्हिस (IPS) साठी झाली. त्यांचे व्यक्तिमत्त्व, बुद्धिमत्ता आणि देखणेपणा यांचा संगम इतका प्रभावी आहे की त्या सौंदर्य आणि कर्तृत्वाचे अप्रतिम उदाहरण ठरतात.
सिमाला प्रसाद यांचा जन्म 8 ऑक्टोबर 1980 रोजी भोपाल (मध्य प्रदेश) येथे झाला. त्यांचे वडील डॉ. भागीरथ प्रसाद हे IAS अधिकारी होते तसेच 2014 ते 2019 दरम्यान भिंड मतदारसंघाचे खासदारही होते. आई मेहरुन्निसा परवेज या नामवंत साहित्यिका असून, त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अशा विद्वान आणि सुसंस्कृत कुटुंबात वाढलेल्या सिमालांनी लहानपणापासूनच अभ्यास आणि शिस्त यांना प्राधान्य दिले.
सिमालांनी सेंट जोसेफ को-एड स्कूल, भोपाल येथे आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी इन्स्टिट्यूट फॉर एक्सलन्स इन हायर एज्युकेशन (IEHE) येथून बी.कॉम पदवी प्राप्त केली. पुढे त्यांनी बरकतुल्लाह विद्यापीठातून समाजशास्त्रात (Sociology) पदव्युत्तर शिक्षण घेतले, ज्यात त्यांनी विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक (Gold Medal) जिंकले. UPSC साठी तयारी करताना सिमालांनी सिलेबस पूर्ण समजून घेतला, वेळेचं नियोजन केलं आणि अभ्यासाचा ठोस आराखडा तयार केला.
UPSC पूर्वी सिमालांनी MPPSC परीक्षा उत्तीर्ण करून बैतूल जिल्ह्यात DSP (Deputy Superintendent of Police) म्हणून काम केलं. त्यानंतर UPSC मध्ये यश मिळवत त्या 2011 बॅचच्या IPS अधिकारी बनल्या. त्यांचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी विविध जिल्ह्यांत जबाबदाऱ्या सांभाळल्या आणि आपल्या कार्यक्षमतेने ओळख निर्माण केली.
अभ्यासू अधिकारी असूनही सिमालांनी कला क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे. त्यांनी 2016 मध्ये दिग्दर्शक जैगम इमाम यांच्या ‘अलिफ’ या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं. त्यानंतर त्या 2019 च्या ‘नक्काश’ या चित्रपटात झळकल्या. त्यांच्या अभिनयाचंही कौतुक झालं, पण त्या नेहमी म्हणतात, “माझी खरी ओळख एक अधिकारी म्हणूनच आहे.” सिमाला प्रसाद यांची यशोगाथा प्रत्येक UPSC उमेदवारासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी दाखवून दिलं की, जर मेहनत, नियोजन आणि आत्मविश्वास असेल, तर पहिल्याच प्रयत्नातही मोठं स्वप्न साकार करता येतं. त्यांचा प्रवास सांगतो, “सौंदर्य तात्पुरतं असतं, पण कर्तृत्व कायम अमर राहतं.”