फोटो सौजन्य - Social Media
शालिनी अग्निहोत्री यांची यशोगाथा हजारो तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. हिमाचल प्रदेशातील ऊना जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबात जन्मलेली शालिनी लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. तिचे शालेय शिक्षण धर्मशाळा इथं झालं. शालिनीने दहावीला ९२ टक्के गुण मिळवले, तर बारावीच्या परीक्षेत तिने ७७ टक्के गुण मिळवले. तिच्या अभ्यासूवृत्तीमुळे घरच्यांची तिच्यावर खूप अपेक्षा होती, पण शालिनीने त्या अपेक्षा केवळ पूर्णच केल्या नाहीत, तर त्याहीपलीकडे जाऊन यश संपादन केलं.
शालेय शिक्षणानंतर शालिनीने हिमाचल युनिव्हर्सिटी मधून कृषीशास्त्रात (Agriculture) पदवी घेतली. त्यानंतर तिने एमएससी (MSc) पूर्ण केलं. शिक्षण घेऊन चांगली नोकरी मिळवणं एवढंच तिचं स्वप्न नव्हतं. तिचं स्वप्न होतं, देशासाठी काहीतरी मोठं करायचं!
शालिनी सांगते की, तिला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाण्याची प्रेरणा एका अपमानास्पद प्रसंगातून मिळाली. एकदा ती आणि तिची आई प्रवास करत असताना बसमध्ये तिच्या आईशी वाईट वागणूक देण्यात आली. त्या घटनेचा तिच्या मनावर खोल परिणाम झाला. ती म्हणाली, “त्या दिवशी मी ठरवलं, आता अधिकारीच व्हायचं!” या अपमानानेच तिला दिशा दाखवली.
शालिनीने कोणतीही कोचिंग क्लासेस न घेता, केवळ ऑनलाइन स्टडी आणि सेल्फ स्टडी च्या जोरावर UPSC सिव्हिल सेवा परीक्षा दिली. 2011 साली तिला ऑल इंडिया रँक 285 मिळाली आणि तिला IPS सेवा मिळाली. एवढ्यावरच ती थांबली नाही. पुढच्या वर्षी, 2012 सालीही तिने UPSC परीक्षा पुन्हा दिली आणि ती पुन्हा यशस्वी झाली. तिच्या जिद्दीचा आणि मेहनतीचा हा आदर्श उदारहण ठरतो.
आज शालिनी अग्निहोत्री एक कर्तव्यदक्ष आणि सजग IPS अधिकारी आहे. तिची कहाणी सांगते की, अपमान सहन न करता त्यावर कृती करणे हेच खरे यश आहे. कमी साधनं, कुठलेही गॉडफादर नसताना फक्त स्वतःच्या मेहनतीवर आणि ध्येयावर विश्वास ठेऊन शालिनीने यशाचं शिखर गाठलं. ही यशोगाथा आजच्या तरुणांनी नक्की वाचावी आणि शिकावं की अडचणी आणि अपमान हेच अनेकदा यशाचं खरं कारण ठरतात.