फोटो सौजन्य - Social Media
विवा कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या परिसरात ‘आविष्कार आंतर-महाविद्यालयीन संशोधन अधिवेशन २०२४-२५’ चे भव्य आयोजन करण्यात आले. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली आणि झोन ६ अंतर्गत पालघर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या सहभागाने, या अधिवेशनाने संशोधन क्षेत्रात एक नवा आयाम निर्माण केला. या एकदिवसीय अधिवेशनामध्ये वाणिज्य, कला आणि विज्ञान शाखांतील एकूण १२० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला, तर २५९ हून अधिक प्राध्यापक आणि विद्यार्थी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभागी झाले. कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विकास विभागाचे डायरेक्टर डॉ. सुनील पाटील, डॉ. मीनाक्षी गुरव (ओएसडी, आविष्कार संशोधन अधिवेशन, मुंबई विद्यापीठ), डॉ. मनीष देशमुख (सह-समन्वयक, आविष्कार संशोधन अधिवेशन, पालघर जिल्हा) तसेच विवा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. श. अडिगल, उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे आणि डॉ. दीपा वर्मा उपस्थित होते.
विद्यार्थी जीवनात संशोधनाची आवड निर्माण करून त्यांना विद्यापीठ व राज्यस्तरीय संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश मुंबई विद्यापीठाने या अधिवेशनामागे ठेवला आहे. दिवसेंदिवस होणाऱ्या नवनवीन संशोधनांमुळे राष्ट्र उभारणीच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले जात आहे. यासाठी राज्य आणि केंद्र सरकारे देखील संशोधनासाठी विविध योजनांद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देत आहेत. या अधिवेशनामध्ये विविध प्रकारच्या संशोधनांसाठी सहा प्रमुख श्रेणी तयार करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये मानवता, भाषा आणि ललित कला; वाणिज्य, व्यवस्थापन आणि कायदा; शुद्ध विज्ञान; कृषी आणि पशुसंवर्धन; अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान; तसेच औषध आणि फार्मसी यांचा समावेश होता. विवा महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची कृषी आणि पशुसंवर्धन तसेच औषध आणि फार्मसी या श्रेणींसाठी पुढील फेरीसाठी निवड झाली, ही महाविद्यालयासाठी एक अभिमानाची बाब ठरली.
कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे डायरेक्टर डॉ. सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शन मिळाले. तसेच, विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री. हितेंद्रजी ठाकूर, संस्थेच्या सेक्रेटरी अपर्णा ठाकूर, व्यवस्थापन समितीचे सदस्य संजीव पाटील, संजय पिंगुळकर आणि एस.एन. पाध्ये यांनीही अधिवेशनाच्या यशस्वितेसाठी विशेष सहकार्य केले. विवा महाविद्यालयाचे समन्वयक नारायण कुट्टी यांनी या उपक्रमासाठी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे नियोजन आणि समन्वय स्थानिक समन्वयक डॉ. रोहन गवाणकर यांनी यशस्वीपणे केले. त्यांनीच अधिवेशनाच्या शेवटी आभारप्रदर्शन करत सहभागी विद्यार्थी, प्राध्यापक आणि मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले.
‘आविष्कार’ अधिवेशनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ संशोधनाची ओळख करून देणेच नव्हे, तर त्यांना संशोधन क्षेत्रात कारकीर्द घडवण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा मुंबई विद्यापीठाचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण होऊन त्यांच्या नाविन्यपूर्ण विचारांनी आणि प्रयोगशीलतेने राष्ट्रनिर्मितीच्या दिशेने पाऊल उचलले जाईल, याची खात्री या उपक्रमातून दिली जात आहे. विवा महाविद्यालयाच्या या यशस्वी आयोजनाने पालघर जिल्ह्यातील शैक्षणिक व संशोधन क्षेत्राला नवी दिशा देण्याचे काम केले आहे, असे मान्यवरांनी यावेळी नमूद केले.