फोटो सौजन्य - Social Media
मुंबईतील बीएमसी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरलेली कहाणी म्हणजे अक्षरा वर्माची. साध्या कुटुंबातून आलेली ही मुलगी दहावीच्या परीक्षेत तब्बल ९६.८ टक्के गुण मिळवत संपूर्ण मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये अव्वल ठरली. तिच्या या यशामागे तिचा जिद्द, आईचा विश्वास आणि टाटा मोटर्सने दिलेले उपचारात्मक प्रशिक्षण यांचा मोठा वाटा आहे. आर्थिक अडचणी असूनही अक्षराच्या आईने इंग्रजी माध्यमातील बीएमसी शाळेत तिला दाखल केले. वरळी सीफेस शाळेत तिचा शैक्षणिक प्रवास केवळ पाठ्यपुस्तकांपुरता मर्यादित नव्हता, तर टाटा मोटर्सच्या विशेष उपचारात्मक प्रशिक्षण वर्गांनी तिच्या क्षमतेला नवे बळ दिले. हे प्रशिक्षण वर्ग इयत्ता नववी आणि दहावीतील विद्यार्थ्यांसाठी डिझाइन करण्यात आले होते, ज्यामध्ये मुलभूत शिक्षणातील अंतर भरून काढणे, साक्षरतेची पातळी उंचावणे आणि मुख्य शैक्षणिक कौशल्यांना निपुण करणे हा उद्देश होता.
हायब्रिड ई-लर्निंग मॉडेल, परस्परसंवादी ऑडिओ-व्हिज्युअल धडे, प्रेरणादायी सत्रे आणि वैयक्तिक लक्ष देणारे प्रशिक्षण यामुळे अक्षराला शिक्षणाबाबत नवा आत्मविश्वास मिळाला. तिने सांगितले, “शिक्षणाने माझ्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. टाटा मोटर्सने माझ्या मूलभूत ज्ञानाला भक्कम करण्यास आणि आत्मविश्वास वाढविण्यास महत्त्वाची मदत केली. यामुळेच मी बोर्ड परीक्षेत चांगली कामगिरी करू शकले. आता मी डॉक्टर होण्याच्या स्वप्नाच्या जवळ पोहोचले आहे आणि माझा प्रवास इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा देईल अशी आशा आहे.”
अक्षराने दहावीमध्ये मिळवलेले यश केवळ वैयक्तिक विजय नाही, तर सर्वसमावेशक शिक्षण आणि सामुदायिक पाठिंब्याच्या शक्तीचे प्रतीक आहे. ती सध्या विल्सन कॉलेजच्या विज्ञान शाखेत प्रवेश घेत असून नीट (NEET) परीक्षेची तयारी करत आहे. तिची महत्त्वाकांक्षा आहे की डॉक्टर बनून ती आपल्या कुटुंबाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढेल. तिच्या आईचे शब्द, “नम्र राहा आणि यशातून गर्व नव्हे तर प्रेरणा घ्या,” हे तिच्यासाठी सतत मार्गदर्शक ठरतात.
टाटा मोटर्सच्या सीएसआर प्रमुख विनोद कुलकर्णी यांनी अक्षराच्या यशाबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले, “अक्षराच्या कहाणीतून सिद्ध होते की, प्रतिभेला संधी मिळाली तर उज्ज्वल भविष्य घडू शकते. आम्ही वंचित पार्श्वभूमीतील मुलांना संधी देण्यासाठी कटिबद्ध आहोत, जेणेकरून ते निर्धास्तपणे स्वप्ने पाहतील आणि सन्मानाने ध्येये साध्य करतील.”
आर्थिक वर्ष २०२५ मध्ये टाटा मोटर्सने अशा प्रकारच्या उपक्रमांतून बीएमसी शाळांमधील १४,००० हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोच साधली. या प्रयत्नामुळे साक्षरतेची पातळी लक्षणीयरीत्या सुधारली आणि अक्षरासारख्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेची जाणीव झाली. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनी अक्षराचा प्रवास आपल्याला आठवण करून देतो की साक्षरता ही फक्त कौशल्य नसून जीवनरेखा आहे. शिक्षण सर्वांसाठी समान संधी निर्माण करत असेल, तर स्वप्ने फक्त साकार होत नाहीत, तर ती आकाशाला भिडतात.