
फोटो सौजन्य - Social Media
दरम्यान, सर्वात मोठी चिंता म्हणजे टीईटी परीक्षेचा अत्यंत कमी निकाल. 2013 पासून आतापर्यंत झालेल्या एकूण आठ टीईटी परीक्षांमध्ये जवळपास 29 लाख 74 हजार 600 उमेदवारांनी सहभाग घेतला. मात्र, त्यापैकी केवळ 1 लाख 6 हजार 663 उमेदवारच पात्र ठरले आहेत. यावरून टीईटीचा एकूण सरासरी निकाल फक्त 3.5% इतका निघतो, जो अतिशय कमी आहे. विशेष म्हणजे 2013 आणि 2018 या दोनच वर्षांत अनुक्रमे 5.2% आणि 5.13% इतका निकाल लागला; बाकी सर्व परीक्षांचा निकाल 2.3% ते 2.7% या मर्यादेतच राहिला. त्यामुळे “अशा कमी टक्केवारीमध्ये दोन वर्षांमध्ये परीक्षा कशी पास करणार?” असा प्रश्न अनेक शिक्षक विचारताना दिसत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आज, 23 नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या टीईटी परीक्षा एक महत्त्वाची संधी म्हणून पाहिली जात आहे. या परीक्षेला राज्यभरातून शिक्षकांसह एकूण 1,75,669 उमेदवार बसत आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेष म्हणजे, अजून टीईटी उत्तीर्ण नसलेल्या पहिली ते आठवी वर्गातील शिक्षकांसाठी ही परीक्षा अधिक निर्णायक ठरणार आहे. कारण 2027 पर्यंतच्या मर्यादेमुळे त्यांच्यावर मानसिक ताण वाढत आहे.
गेल्या काही वर्षांत टीईटी परीक्षांमध्ये झालेल्या गैरप्रकारांचाही परिणाम राज्यातील शिक्षकांवर झाला आहे. 2018 आणि 2019 च्या परीक्षांमध्ये अनियमितता आढळल्यामुळे 9,537 उमेदवारांची पात्रता रद्द करण्यात आली आहे. या घटनेनंतर परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्यासाठी राज्य परीक्षा परिषद अधिक सतर्क झाली आहे. पुढील दोन वर्षांत टीईटी उत्तीर्ण दर वाढवण्यासाठी किमान चार अतिरिक्त परीक्षा घेण्याची तयारी सुरू असल्याचेही समजते.
तथापि, कमी निकाल आणि वाढती स्पर्धा यामुळे शिक्षकांमध्ये धाकधूक कायम आहे. अनेक शिक्षक सांगतात की, शाळेचे काम, प्रशासकीय जबाबदाऱ्या आणि टीईटीची कठीण पातळी यामुळे तयारीसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेली 2027 ची कठोर मर्यादा त्यांच्या चिंता आणखी वाढवत आहे. त्यामुळे आजची टीईटी परीक्षा केवळ विद्यार्थ्यांच्या अध्यापन पात्रतेची चाचणी नाही, तर हजारो शिक्षकांच्या नोकरीशी निगडित महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.