
फोटो सौजन्य - Social Media
एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानामुळे देशाच्या शिक्षण व्यवस्थेत लवकरच मोठे आणि दूरगामी बदल घडून येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी यूपीआयसारखा एक राष्ट्रीय डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केला जात असून, त्याचे नाव ‘भारत बोधन एआय स्टॅक’ असे असणार आहे. या प्लॅटफॉर्ममुळे शाळा ते महाविद्यालयीन शिक्षणातील कोणत्याही विषयाचा कोणताही टॉपिक विद्यार्थ्यांना थेट मोबाईलवर ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध होणार आहे.
या एआय प्लॅटफॉर्मचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या भाषेत आणि पसंतीच्या शिक्षकांच्या आवाजात व्याख्याने ऐकू शकतील. भाषा बदलली तरी शिक्षकाचा आवाज, टोन आणि शिकवण्याची शैली तशीच राहणार आहे. विद्यार्थी जसा प्रश्न विचारेल, त्यानुसार तात्काळ कस्टमाइज्ड लेक्चर तयार होईल. ऑडिओ किंवा व्हिडिओ यापैकी कोणताही पर्याय निवडण्याची मुभा विद्यार्थ्यांना असेल. हे संपूर्ण व्यासपीठ इंटरॲक्टिव्ह असल्याने प्रश्न विचारून लगेच उत्तरे मिळवणे शक्य होणार आहे. ज्याप्रमाणे भीम, गुगल पे, फोनपे आणि पेटीएम यांसारखी ॲप्स यूपीआयवर आधारित आहेत, त्याच धर्तीवर शिक्षणाशी संबंधित विविध मोबाइल ॲप्स ‘भारत बोधन एआय स्टॅक’वर कार्यरत राहतील. हे व्यासपीठ पूर्णपणे लवचिक आणि विद्यार्थ्यांच्या गरजांनुसार सानुकूल केलेले असेल.
शिक्षणात एआयच्या संस्थात्मक वापराला चालना देण्यासाठी 12 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे ‘बोधन एआय’ उपक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात येणार आहे. यावेळी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘भारत बोधन एआय कॉन्क्लेव्ह’मध्ये निवडक एआय आधारित शैक्षणिक सोल्यूशन्सचे प्रदर्शनही होणार आहे. या उपक्रमांतर्गत शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, कौशल्य विकास, एआय संशोधन आणि डीप टेक्नॉलॉजी क्षेत्रातील प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. हे सर्व प्रस्ताव राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याशी सुसंगत असतील.
दरम्यान, शिक्षण मंत्रालयाने आयआयटी मद्रासमध्ये शिक्षणातील एआयसाठी सेंटर फॉर एक्सलन्स स्थापन केले असून, त्याला ‘आयआयटी मद्रास बोधन एआय फाउंडेशन’ असे नाव देण्यात आले आहे. या केंद्रामार्फत स्केलेबल एआय सोल्यूशन्स विकसित करण्यात येणार आहेत.
मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, 12वीचा विद्यार्थी ऑप्टिक्ससारखा विषय शिकायचा असल्यास तो थेट प्लॅटफॉर्मवर निवड करू शकेल. एनसीईआरटी आणि राज्य मंडळांची पाठ्यपुस्तके एआय रिपॉझिटरीचा भाग बनवण्याचे उद्दिष्ट असून, हे काम पुढील दोन वर्षांत पूर्ण केले जाणार आहे. वर्गखोलीपासून ते स्पर्धा परीक्षांची तयारी, थ्री-डी लॅब अनुभव आणि संशोधनापर्यंत हे व्यासपीठ विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.