
फोटो सौजन्य - Social Media
पहिल्या फेरीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना २१ डिसेंबर रोजी आपला प्रवेश रद्द करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानंतर २२ डिसेंबर रोजी रिक्त जागांचा सविस्तर तपशील जाहीर केला जाणार आहे. या रिक्त जागांच्या आधारे इच्छुक विद्यार्थ्यांना २२ ते २४ डिसेंबरदरम्यान ऑनलाईन पद्धतीने पसंतीक्रम भरता येणार आहे. पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २६ डिसेंबर रोजी निवड यादी जाहीर करण्यात येईल. निवड यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना २७ ते ३० डिसेंबर या कालावधीत संबंधित वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
दरम्यान, प्रवेश प्रक्रियेला उशीर झाला असला तरी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रत्यक्ष वर्ग २२ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याचे सीईटी कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया आणि वर्ग सुरू होण्याचा कालावधी एकाच वेळी हाताळावा लागणार आहे. यामुळे काही प्रमाणात विद्यार्थ्यांची धावपळ वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दुसरी फेरी पूर्ण झाल्यानंतर नवीन वर्षात तिसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे. ३० डिसेंबर रोजी दुसरी फेरी संपल्यानंतर ३ जानेवारी २०२६ रोजी विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत घेतलेला प्रवेश रद्द करण्याची संधी दिली जाणार आहे. त्यानंतर ४ ते ६ जानेवारी या कालावधीत तिसऱ्या फेरीसाठी ऑनलाईन नोंदणी तसेच आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ७ जानेवारी रोजी गुणवत्ता यादी आणि रिक्त जागांचा तपशील जाहीर केला जाणार आहे.
पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील या टप्प्यांमुळे अनेक विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपणार असून उर्वरित जागांवर लवकरच प्रवेश निश्चित होण्याची शक्यता आहे. सीईटी कक्षाने विद्यार्थ्यांना वेळापत्रकाचे काटेकोर पालन करण्याचे आणि अधिकृत संकेतस्थळावर नियमितपणे अद्ययावत माहिती तपासण्याचे आवाहन केले आहे.