फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्रातील प्रमुख महानगरपालिकांपैकी एक असलेल्या ठाणे महानगरपालिका (TMC) कडून १७७३ पदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. गट-क आणि गट-ड संवर्गातील ही पदे सरळसेवा पद्धतीने भरली जाणार असून, सरकारी नोकरीच्या इच्छुकांसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे. प्रशासकीय, लेखा, तांत्रिक, अग्निशमन, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय आणि निमवैद्यकोष अशा विविध विभागांमध्ये ही भरती होणार आहे. या विभागामध्ये आधीच अनुभव असल्यास तुम्ही सहज या पदांसाठी पात्र ठरू शकता.
अर्ज प्रक्रिया १२ ऑगस्ट २०२५ पासून सुरू झाली असून २ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येतील. सर्वाधिक ४५७ पदे नर्स मिडवाईफ/परिचारिका/स्टाफ नर्स या संवर्गासाठी आहेत, तर फायरमनसाठी ३८१ आणि चालक/यंत्रचालकसाठी २०७ पदे उपलब्ध आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे. परीक्षा शुल्क अमागास प्रवर्गासाठी ₹1000 निश्चित करण्यात आली आहे. मागास व अनाथ प्रवर्गासाठी हेच परीक्षा शुल्क ₹900 निश्चित करण्यात आले आहे, तर माजी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिकांसाठी परीक्षा शुल्क माफ ठेवण्यात आले आहे.
अधिकृत संकेतस्थळ [www.thanecity.gov.in](http://www.thanecity.gov.in) वर अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी संवर्गनिहाय पदांची संख्या, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, आरक्षण, निवड प्रक्रिया आणि इतर अटी काळजीपूर्वक वाचाव्यात. तसेच, एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करत असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज व शुल्क भरणे आवश्यक आहे. ही भरती उमेदवारांना ठाणे महापालिकेच्या विविध विभागात स्थिर सरकारी नोकरीची संधी देणार असून, शासकीय सुविधा, नोकरीची सुरक्षितता आणि स्थानिक प्रशासनात अनुभव मिळवण्याची उत्तम संधी उपलब्ध करून देणार आहे.
ठाणे तसेच मुंबई विभागात राहणाऱ्या तसेच नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना या भरतीचा लाभ घेता येणार आहे. अधिक माहितीसाठी जाहीर करण्यात आलेल्या जाहिरातीचा आढावा घेण्यात यावा. सर्व निकषांना पात्र करत उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.