फोटो सौजन्य - Social Media
राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील प्रेमसुख डेलू सध्या फार चर्चेत आहे. जिद्द असणे किती महत्वाचे असते? याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे प्रेमसुख डेलू! कॉन्स्टेबल परीक्षेसाठी अर्ज केले असता तेथे त्याला अपयश हाती आले. UPSC च्या पहिल्या प्रयत्नातही तेच घडलं. पण पट्ठ्याने कष्ट काही सोडले नाही, पुन्हा प्रयत्न केले आणि अखेर प्रेमसुख डेलूने बाजी मारलीच.
प्रेमसुख डेलू एका गरीब शेतकरी कुटुंबातील अतिशय सामान्य मुलगा! बाबा शेतकरी तर आई गृहिणी, मोठ्या बहिणीला तर शिक्षणही घेता आले नाही. वडील शेती करत आणि उंट हाकलत, या कामांवर प्रेमसुखाचा कुटुंब चालत होते. आर्थिक अडचणींचा परिणाम त्यांच्या आयुष्यवर मोठा होत होता. तरी यातून सांभाळून त्यांनी २०१० मध्ये पदवी घेतली.त्यानंतर पटवारी परीक्षा पास केली आणि सरकारी नोकरीत पहिले पाऊल टाकले. प्रेमसुख डेलूने नोकरी करत असतानाही आपले स्वप्न मात्र मोठं ठेवलं UPSC! त्यांनी अनेक परीक्षा दिल्या. दरम्यान, ग्रामसेवक परीक्षा त्यांनी दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण केली. राजस्थान पोलीस उपनिरीक्षक (SI) पदासाठीही त्यांची निवड झाली. मात्र त्यांनी सहायक जेलर म्हणून सेवा स्वीकारली. त्यानंतर त्यांनी तहसीलदार, शाळेतील व्याख्याता आणि महाविद्यालयीन लेक्चरर अशा विविध पदांवर काम केलं. या सगळ्या सरकारी नोकऱ्या करत करत, त्यांनी UPSC सिव्हिल सेवा परीक्षेसाठी पुन्हा तयारी केली. या तयारीला चिकाटी, सातत्य आणि कठोर परिश्रमाची जोड होती. शेवटी 2020 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात त्यांना 170 वी रँक मिळाली आणि त्यांचे आयुष्यच बदलून गेले ते IPS अधिकारी बनले!
सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या पोलीस खात्यात त्यांनी कॉन्स्टेबलसाठी अर्ज केला होता आणि अपयश मिळालं होतं, त्याच विभागात आता ते एका वरिष्ठ IPS अधिकाऱ्याच्या भूमिकेत परतले आहेत. सहावर्षात त्यांनी एकूण १२ सरकारी नोकऱ्या मिळवल्या आणि प्रत्येकवेळी ते अधिक चांगल्या संधीकडे वाटचाल करत गेले. हे यश एका निर्धारलेल्या तरुणाचे आहे, ज्याने गरिबी, अपयश, आणि सामाजिक अडथळे यांच्यावर मात करत स्वप्न साकार केलं. आज प्रेमसुख डेलू संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांसाठी आणि तरुणांसाठी एक आदर्श ठरले आहेत. त्यांची कथा सांगते. अडचणी येतातच, पण खऱ्या योद्ध्याला थांबवू शकत नाहीत!