
फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने “करिअर कट्टा” या उपक्रमांतर्गत सोलार सोसायटी ऑफ इंडिया व विवा महाविद्यालयाच्या सहकार्याने सौर ऊर्जा जनजागृती अभियान २०२५ राबविण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन २१ जून २०२५ रोजी विवा महाविद्यालय, विरार येथे करण्यात आले होते. नुकतेच या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून विवा महाविद्यालयाने राज्यस्तरीय प्रथम क्रमांक पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
या उपक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातून विविध महाविद्यालयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धेच्या माध्यमातून ५५,५५५ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. या दोन दिवसीय उपक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, मॉडर्न कॉलेज, पुणेचे प्राचार्य डॉ. एस.एस. खरात, विवा महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. दीपा वर्मा, उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे व इतर मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेच्या माध्यमातून सौर ऊर्जा विषयक जनजागृती, पर्यावरणपूरक ऊर्जा वापराचे महत्त्व, सौर तंत्रज्ञानातील नवकल्पना यावर विशेष भर देण्यात आला. विवा महाविद्यालयाने स्पर्धेतील उत्कृष्ट सादरीकरण, सहभाग, शाश्वत उपाययोजना यामुळे राज्यपातळीवर प्रथम क्रमांकाचे यश मिळवले. विशेष म्हणजे, विवा महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी दिक्षा जयप्रकाश गोठणकर हिची जिल्हास्तरीय स्तरावर निवड करण्यात आली असून तिला सौर ऊर्जा दूत म्हणून मान्यता मिळाली आहे.
या घवघवीत यशाबद्दल विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय हितेंद्र ठाकूर, संस्थेच्या सेक्रेटरी अपर्णा ठाकूर, संस्थेचे खजिनदार शिखर ठाकूर, तसेच व्यवस्थापन समिती सदस्य संजय पिंगुळकर, संजीव पाटील, एस.एन. पाध्ये यांनी आनंद व्यक्त करत विवा महाविद्यालयाचे समन्वयक नारायण कुट्टी यांच्यासह सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाचे भान आणि हरित ऊर्जा वापराबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणारा ठरला आहे.