फोटो सौजन्य - Social Media
‘परिश्रम ही यशाची खरी गुरुकिल्ली असते’ हे वाक्य प्रेमसुख डेलू यांच्या आयुष्यावर अगदी तंतोतंत लागू पडते. राजस्थानच्या बीकानेर जिल्ह्यातील नोखा तालुक्यातील रासीसर या लहानशा गावात जन्मलेल्या प्रेमसुख यांचे बालपण अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत गेले. वडील शेतकरी होते आणि ऊंटगाडी चालवून उदरनिर्वाह करत होते. या अत्यंत दारिद्र्याच्या काळातही प्रेमसुख यांना शिक्षणाची ओढ होती. ते लहानपणापासून मवेशी चारताना देखील पुस्तकं वाचायचे.
घरात शिक्षणासाठी अनुकूल वातावरण नव्हते. त्यांची मोठी बहीण तर शाळेचं तोंडही पाहू शकली नव्हती. मात्र, प्रेमसुख यांनी सरकारी नोकरी मिळवून आपल्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढण्याचा निश्चय केला होता. ते सरकारी शाळेत शिकले आणि खडतर अभ्यास करून विविध स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे दाखवून दिलं की, परिस्थिती कितीही कठीण असली, तरी मेहनतीपुढे ती काहीच नाही.
केवळ 6 वर्षांच्या कालावधीत त्यांनी तब्बल 12 सरकारी नोकऱ्या मिळवल्या. सुरुवातीला ते पटवारी म्हणून नियुक्त झाले. त्यानंतर त्यांनी ग्रामसेवक परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवला. त्यांनी राजस्थान पोलिस उपनिरीक्षक पद स्वीकारण्याऐवजी जेलर पदावर काम करण्याचे ठरवले. त्यांनी इतिहास विषयात एम.ए. करताना सुवर्णपदक मिळवले आणि नंतर यूजीसी नेट व जेआरएफ परीक्षा उत्तीर्ण केल्या. अभ्यासात सातत्य ठेवत, त्यांनी UPSC परीक्षेत दुसऱ्याच प्रयत्नात यश मिळवले आणि देशात 170वी रँक मिळवत ते IPS अधिकारी झाले.
प्रेमसुख डेलू यांनी आयुष्यातील सर्व अडचणींवर मात करून यशाची नवी व्याख्या निर्माण केली. आज ते अशा अनेक तरुणांसाठी प्रेरणा आहेत, जे खडतर परिस्थितीतूनही मोठे स्वप्न पाहतात. त्यांचे यश हे एकच सांगून जातं, “परिस्थिती कधीच अंतिम नसते, ठाम निर्धार आणि अविरत परिश्रम यामुळे कोणताही शिखर गाठता येतो.”