फोटो सौजन्य - Social Media
देशभरात दहावी बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. अशामध्ये विद्यार्थ्यांच्या मनात त्यांच्या भविष्या बद्दल अनेक प्रश्न तयार झाले असतील. दहावी तसेच बारावीनंतर विद्यार्थी गोंधळात असतात. अनेक पर्याय उपलब्ध असल्याने नेमकं आपण कोणत्या मार्गाने जायला हवे? यात विद्यार्थ्यांचे विचार गुंतलेले असतात. बारावीच्या नंतर उमेदवार कॉमर्स क्षेत्रातील उमेदवार कोणत्या क्षेत्रात गेले की त्यांना उत्तम पगाराची नोकरी मिळेल? चला तर मग जाणून घेऊयात.
चार्टर्ड अकाउंटन्सी (CA) अनेक वाणिज्य विद्यार्थ्यांची पहिली पसंती आहे. या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही वाणिज्य क्षेत्रामध्ये एक तद्न्य म्हणून स्वतःची ओळख निर्माण करू शकता. या कोर्समध्ये तुम्हाला ऑडिटिंग आणि टॅक्स प्लॅनिंग तसेच वित्त व्यवस्थापन यांसारख्या महत्वाच्या संकल्पनांचे प्रशिक्षण दिले जाते. हा कोर्स आव्हानात्मक मानला जातो, पण जर तुम्ही मेहनतीने अभ्यास केला तर मोठ्या आर्थिक संस्थांमध्ये, नामांकित कंपन्यांमध्ये किंवा स्वतंत्र प्रॅक्टिससाठी स्वतःला तयार करू शकता. हा कोर्स ICAI (इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया) मार्फत दिला जातो आणि त्याचे विविध स्तर असतात. हे सर्व स्तर उत्तीर्ण झाल्यावर तुम्ही प्रमाणित चार्टर्ड अकाउंटंट बनता.
बीकॉम भारतातील अतिशय सामान्य कोर्स आहे. वाणिज्य क्षेत्रातील बहुतेक विद्यार्थी B.Com ची निवड करतात. एकूण तीन वर्षांचा हा कोर्स आहे. यामध्ये फायनान्स, अकाउंटिंग आणि टॅक्सेशनसंबंधित विषय शिकवले जातात. ज्यांना अकाउंटिंग, फायनान्स किंवा व्यवसाय क्षेत्रात रस आहे त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. बीकॉम केल्यानंतर विद्यार्थी CA, CS किंवा MBA सारखे उच्च शिक्षण घेऊ शकतात, जे करिअरच्या दृष्टीने अधिक संधी निर्माण करू शकते.
ज्यांना व्यवसाय व्यवस्थापन (बिझनेस मॅनेजमेंट) क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्यांच्यासाठी BBA हा सर्वोत्तम कोर्स आहे. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना व्यवसायाची संपूर्ण समज दिली जाते. आंतरराष्ट्रीय व्यापार (इंटरनॅशनल बिझनेस), मानवी संसाधन (ह्यूमन रिसोर्सेस) आणि विपणन (मार्केटिंग) यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश असतो. बीबीए केल्यानंतर विद्यार्थी MBA सारखा उच्च अभ्यासक्रम करू शकतात, जो चांगल्या करिअरच्या संधी आणि उच्च पगाराच्या नोकरीस मदत करू शकतो. जर तुम्ही वाणिज्य क्षेत्रातील विद्यार्थी आहात तर नक्कीच या क्षेत्रांचा विचार करा आणि वाणिज्य क्षेत्रात मोठी भरारी घ्या. पुढे या क्षेत्रात मास्टर्स ही करू शकता आणि मोठ्या पदावर काम करू शकता.