
नाशिकरोडच्या आर्टिलरी सेंटरमध्ये अग्निवीर प्रशिक्षणार्थीचा बॅरेकमध्ये मृत्यू; २० वर्षीय अश्विनच्या मृत्यूचे कारण...
अश्विन एम. हा नाशिकरोडच्या आर्टिलरी सेंटरमध्ये अग्निवीर म्हणून प्रशिक्षण घेत होता. प्रशिक्षणाच्या काळात त्याची राहण्याची व्यवस्था आर्मी बॅरेकमध्ये करण्यात आली होती. गुरुवारी सकाळी तो बॅरेकमध्ये गंभीर अवस्थेत आढळून आला. ही बाब सहकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना माहिती दिली. यानंतर अश्विनला तातडीने देवळाली कॅम्प येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. लेफ्टनंट कर्नल पंकज कुमार यांनी त्याची तपासणी करून मृत घोषित केल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपनगर पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली आहे. पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस हवालदार झाडे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. अश्विनच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याने असे टोकाचे पाऊल कोणत्या परिस्थितीत उचलले, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे पोलिसांकडून घटनाक्रमाची पडताळणी केली जात आहे.
पोलिसांकडून बॅरेकमधील परिस्थिती, प्रशिक्षणादरम्यानच्या बाबी आणि इतर संभाव्य कारणांचा तपास केला जात आहे. संबंधित व्यक्तींकडून माहिती घेण्यासह उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, २० वर्षीय प्रशिक्षणार्थीच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्याच्या सहकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. आर्टिलरी सेंटर परिसरातही या घटनेने शोककळा पसरली आहे. पोलिसांच्या तपासानंतरच अश्विनच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.