सौजन्य फोटो - सोशल मिडीया
भंडारा: भंडारा जिल्ह्यातील नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगावजवळ पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. पेट्रोल पंपावरून महामार्गावर येत असलेल्या ट्रकला भरधाव बोलेरो वाहनाने मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बोलेरोचा अक्षरशः चक्काचूर झाला. या दुर्घटनेत महिला आणि चिमुकल्यांसह आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
पंपावरून हायवेवर आली अन् काही सेकंदांत अपघात
प्राथमिक माहितीनुसार, ट्रक पेट्रोल पंपावरून महामार्गावर येत होता. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या बोलेरो वाहनाने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. वाहनाचा वेग अधिक असल्याने ही धडक अत्यंत भीषण झाली. अपघातात बोलेरोचे मोठे नुकसान झाले असून, त्यातील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा नऊवर पोहोचला.
हेही वाचा: Ahilyanagar Accident: एकाच दिवशी ३ जिल्ह्यांसाठी काळा दिवस; तीन अपघातांत २१ जणांचा बळी
चिमुकल्यांसह महिलांचा दुर्दैवी मृत्यू
या अपघातात तीन चिमुकल्यांसह महिलांचाही मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. नागरिकांनी मदतकार्य करत जखमींना बाहेर काढण्यास पोलिसांना सहकार्य केले.
अपघातापूर्वीचे दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद
या भीषण दुर्घटनेपूर्वीचे काही क्षण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. फुटेजमध्ये बोलेरो वाहन महामार्गावरून येताना दिसत असून, त्यानंतर काही क्षणांतच अपघात झाल्याचे दिसून येते. त्यामुळे या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून अपघाताचा नेमका घटनाक्रम तपासला जात आहे. बोलेरोचा वेग अधिक असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले असावे आणि त्यातून ट्रकला मागून धडक बसली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. या दुर्घटनेमुळे भंडारा जिल्ह्यात शोककळा पसरली असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताचा पुढील तपास संबंधित पोलीस यंत्रणेकडून सुरू आहे.






