बारामतीत भीषण अपघात, हायवाच्या धडकेत वडिलांसह दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू
बारामती : राज्यात अपघाताच्या घटना वाढल्या असून, बारामती शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हायवा ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील पित्यासह दोन लहान मुलींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बारामती शहरात रविवारी (दि २६) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारस घडली आहे. ओंकार राजेंद्र आचार्य (वय ३२, रा. सणसर, ता. इंदापूर) , सई ओंकार आचार्य (वय १०), मधुरा ओंकार आचार्य (वय ४) असे या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
बारामती शहरातील खंडोबानगर चौकात हा अपघात झाला आहे. ओंकार आचार्य हे स्प्लेंडर या दुचाकीवरून दोन्ही मुलींना घेऊन निघाले होते. त्यावेळी हायवा ट्रॅकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यावेळी मागच्या चाकाखाली आल्याने ओंकार आचार्य यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या दोन मुलींना स्थानिक नागरिकांनी दवाखान्यात नेत असतानाच त्या दोन मुलींचा रस्त्यातच मृत्यू झाला. दरम्यान या अपघाताचे दृश्य पाहिल्यानंतर, अनेकांचे डोळे पाणावले. अधिक तपास बारामती पोलीस करत आहेत.
रिक्षाची ज्येष्ठाला जोरदार धडक
पुण्यातील बाणेर भागात रिक्षा चालकाने दिलेल्या धडकेत ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाला. त्यांना उपचारासाठी घेऊन जातो, अशी बतावणी करून रिक्षाचालकाने रिक्षात बसवले. त्यानंतर खडकीतील रेंजहिल्स परिसरात रेल्वे रूळाजवळ त्यांना जखमी अवस्थेत सोडून रिक्षाचालक पसार झाला. वेळेत उपचार न मिळाल्याने ज्येष्ठाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिकाच्या मुलाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रिक्षाचालकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे-नाशिक महामार्गावरील पेठजवळ टेम्पो पलटी
पुणे-नाशिक महामार्गावरील पेठ गावाच्या हद्दीत गुरुवार, २४ जुलै रोजी रात्री छोटा हत्ती टेम्पो पलटी होऊन झालेल्या अपघातात त्यामधील १० भाविक जखमी झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान या अपघातास पाठीमागून आलेल्या इंडिका कारने टेम्पोला अचानक कट मारणे हे कारण असल्याचे चालक शरद वामन गायकवाड (रा. मालेगाव, जि. नाशिक) यांनी सांगितले. जखमी भाविकांना अपघातस्थळी जमलेल्या नागरिकांच्या मदतीने इतर वाहनांद्वारे मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. साहिल टाके यांनी दिली. दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेली इंडिका कार थांबली नाही आणि चालक पळून गेला आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे.