
15 कोटी रुपये दे, नाहीतर...; जयसिंगपूरच्या व्यापाऱ्याला अपहरण करून लुटले
याप्रकरणी कराड तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी सायंकाळी जयसिंगपूर येथील पेपर ॲण्ड पेपर प्रोडक्टस् व्यावसायिक निकेत श्रीभगवान बियाणी (वय ४३) त्यांचा चालक नवनाथ चोरमुले यांच्यासह गाडीतून साताऱ्याहून जयसिंगपूरकडे निघाले होते. कराडमधील दोन व्यापाऱ्यांकडून पैसे घेऊन बियाणी चालकासोबत कारमधून सायंकाळी सहाच्या सुमारास गाडीतून कराडमधून कोल्हापूरच्या दिशेने निघाले होते.
कराडपासून काही अंतरावरील पुणे-बंगळूर महामार्गावरील पाचवड फाट्यावरील मॅकडोनाल्ड परिसरात कार आल्यानंतर सायंकाळी पावणेसातच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या गाडीतील चार व्यक्तींनी त्यांच्या कारला धडक देत त्याची गाडी बियाणी यांच्या कारला आडवी मारली. काही समजण्यापूर्वीच चाकू व लाकडी दांडक्याचा धाक दाखवून बियाणी यांच्यासह त्यांच्या चालकाला मारहाण करण्यात आली.
५ कोटींची मागितली खंडणी
संशयितांनी बियाणी यांना जबरदस्तीने गाडीत बसवून पाचवड फाटा, उंडाळे रोड, तुळसण परिसर या मार्गांवरून फिरवले. १५ कोटी रुपये दिले नाहीत, तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. बियाणी यांना त्यांच्या मित्रासह भावाला फोन करून अनुक्रमे ५ कोटी व १ कोटी रुपयांची खंडणी मागण्यास भाग पाडले. भीतीपोटी बियाणी यांनी आपल्या कारच्या डिकीत व्यवसायाची रोख रक्कम असल्याचे संशयितांना सांगितले. संशयितांनी कारमध्ये काळ्या रंगाच्या बॅगेत ठेवलेले १० लाख ३५ हजार ७०० रुपये व गळ्यातील सुमारे दोन तोळे सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेत पलायन केले. याप्रकरणी कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.