सौजन्य - सोशल मिडीया
याप्रकरणी राधा पाटील (मुंबई), तसेच बिबवेवाडीतील एम्पायर ग्रुपचे अध्यक्ष भूषण अभिमान सोनवणे (रा. अंबामाता मंदिराजवळ, सुखसागरनगर), आयोजक अमोल काटे (रा. कात्रज) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिस हवालदार नंदलाल भादले यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दहीहंडी उत्सवात एम्पायर ग्रुप ए. के. बॉईजचे अध्यक्ष भूषण सोनवणे आणि कार्यकर्त्यांनी राधा पाटील यांचा लावणी नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. परवानगी मिळण्यासाठी मंडळाकडून बिबवेवाडी पोलिसांत अर्ज सादर करण्यात आला होता. अर्जांच्या अनुषंगाने राज्यातील कला, लोककला, चित्रपट, सांस्कृतिक क्षेत्राशी निगडीत रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र पोलिसांना सादर करणे आवश्यक असते. त्यानुसार कार्यक्रमास परवानगी मिळण्यासाठी पोलिसांकडे अर्ज सादर करावा लागतो. कार्यक्रमाचे आयोजक, तसेच लावणी नृत्यांगना राधा पाटील यांच्याकडून अशा प्रकारची परवानगी मिळविण्यासाठी पोलिसांकडे अर्ज सादर करण्यात आला नव्हता. अधिकृत कागदपत्रे सादर न केल्याने बिबवेवाडी पोलिसांनी परवानगी नाकारली होती. सहायक निरीक्षक गरड आणि पथकाने दहीहंडी सोहळा साजरा करणाऱ्या मंडळांना शनिवारी भेट दिली. तेव्हा विनापरवानगी कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे दिसून आले. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक गरड तपास करत आहेत.
दहीहंडी कार्यक्रमात राधाच्या अदांनी पुणेकर चाहते घायाळ झाले होते. राधाचे नृत्यही इंस्टावरुन व्हायरल झाले असून या नृत्यात अश्लील हावभाव केल्याचा आरोपही काही जणांकडून होत असून सोशल मीडियावर तशा कमेंटही पाहायला मिळत आहेत. त्यातच, आता कार्यक्रमाच्या नृत्य सादरीकरणासाठी आवश्यक प्रमाणपत्र न घेतल्याने राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






