संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जुन्या भांडणातून तरुणाला ‘आज तुला मारून टाकतो,’ अशी धमकी देत पिस्तुलातून गोळीबार करून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली आहे. सुदैवाने गोळी तरुणाला लागली नाही. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी तिघांना अटक केली असून, आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आतिष ऊर्फ मन्या उमेश मोरे, सोन्या हरीकाका कोंढरे आणि सूरज सुभाष डबळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर श्रेयश रुपेश काटे आणि दगड्या ऊर्फ ऋतिक बेलदरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. याबाबत पौर्णिमा रामदास माने (वय ४३) यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना आंबेगाव बुद्रुक येथील हरणाई कॉम्प्लेक्समध्ये ५ सप्टेंबर रोजी रात्री दीडच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदारांचा मुलगा चंद्रकांत हा दुचाकी पार्क करून जिन्याने घराकडे जात होता. त्यावेळी आरोपी त्याच्याजवळ आले. त्यांनी चंद्रकांतला खाली येण्यास सांगितले. त्यानंतर जुन्या भांडणाच्या कारणावरून त्याला शिवीगाळ करत ‘आज तुला मारून टाकतो,’ अशी धमकी दिली. आरोपींपैकी एकाने जवळील गावठी पिस्तुलातून चंद्रकांतच्या दिशेने गोळी झाडली. गोळी त्याला लागली नाही. गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. फरार आरोपींचा शोध घेण्यात येत असून, पुढील तपास आंबेगाव पोलिस करीत आहेत.
अनैतिक संबंधातून वाद, महिलेचा भरदिवसा खून
काखे (ता. पन्हाळा) येथे अनैतिक संबंधांच्या वादातून एका विवाहीत महिलेचा तिच्याच घराच्या अंगणात धारदार चाकूने सपासप वार करून निघृण खून करण्यात आल्याची थरारक घटना बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पूजा अविनाश दाभाडे (वय ३३, रा. काखे) असे मृत महिलेचे नाव असून, सुरेश मधुकर दाभाडे (वय ३५) याने हा हल्ला केला आहे. भरदिवसा घडलेल्या या रक्तरंजित प्रकारामुळे काखे परिसरासह संपूर्ण पन्हाळा तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. बुधवारी दुपारी पूजा दाभाडे या घरात एकट्याच असताना आरोपी सुरेश दाभाडे तिथे आला. जुन्या अनैतिक संबंधांच्या कारणावरून दोघांमध्ये तीव्र वाद झाला. संतापाच्या भरात सुरेशने सोबत आणलेल्या धारदार चाकूने पूजा यांच्यावर अंगणातच अंधाधुंद वार केले. पूजा यांचा आरडाओरडा ऐकून शेजारी धावून आले असता, आरोपी सुरेश घटनास्थळावरून तातडीने पसार झाला.






