विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या
वर्धा : कनिष्ठ महाविद्यालयात बारावीचे प्रवेशशुल्क व गणवेशासाठी तगादा लावण्यात आला होता. मात्र, मोलमजुरी करणाऱ्या आई-वडिलांनी पैसे दिले नाही म्हणून 17 वर्षीय मुलीने घरी कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. 4) पुलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लोणसावळी येथे घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
सोनिया वासुदेव उईके (वय 17, रा. वॉर्ड क्र. 1, लोणसावळी) आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. सोनिया ही मागील शैक्षणिक सत्रात वर्धा येथील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये कॉमर्स शाखेत अकरावीची विद्यार्थिनी होती. ती आदिवासी शासकीय वसतिगृह, रामनगर येथे राहत होती. उन्हाळ्याच्या सुट्या असल्यामुळे ती आपल्या गावी लोणसावळी येथे गेली होती.
आई-वडील, भाऊ कामाला जात होते. बारावीचे वर्ष आहे, मला प्रवेश घ्यावा लागेल, अशी ती सातत्याने आईला सांगत होती. आईने तिला समजावून सांगितले की, हॉस्टेलवर तुझी अॅडमिशन आहेच, पैसे आल्यानंतर आपण तुझ्या शाळेची अॅडमिशनही करू, असे सांगून तिची समजून काढत होते. परंतु, ती पालकांचे ऐकूण घेण्याच्या मानसिकतेत नव्हती.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी आई-वडील, भाऊ कामावर निघून गेले. सोनिया ही एकटीच घरी होती. भाऊ कामावरून घरी आला असता त्याला दार आतून बंद असल्याचे लक्षात आले. त्याने घराच्या मागे जाऊन खिडकीतून पाहिले असता सोनिया हिने बाथरुममधील टिनाच्या अँगलला नॉयलनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. याप्रकरणी माहिती प्राप्त झाल्यावर पुलगाव पोलिस घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. मुलीचा मृतदेह पुलगाव येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
गळफास लावून शेतकऱ्याची आत्महत्या
दुसऱ्या एका घटनेत, गळफास लावून 60 वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केली. ही घटना आष्टी येथील शिवाजी चौकात शुक्रवारी (दि. 4) घडली. देवेंद्र गोपाळराव झाटे (60), असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मृतक देवेंद्र यांच्याकडे वडिलोपार्जित एकूण 8 एकर शेती होती. ती शेती करीत होते. गुरुवारी (दि. 3) सायंकाळी 6.30 वाजतादरम्यान घरी कोणीही नसताना देवेंद्र यांनी पडक्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.