
Accident News: गोंदिया-बालाघाट मार्गावर भीषण अपघात; ट्रक-बोलेरोची जोरदार धडक, ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू, ७ गंभीर
अपघातात वाहन चेंदामेंदा
मिळालेल्या माहितीनुसार, गोंदियाकडून बालाघाटच्या दिशेने एक ट्रक भरधाव वेगाने जात होता. त्याचवेळी बालाघाटकडून गोंदियाच्या दिशेने बोलेरो प्रवासी वाहन येत होते. नागरा परिसरात दोन्ही वाहने समोरासमोर आली असता त्यांच्यात जोरदार धडक झाली. धडक एवढी भीषण होती की बोलेरो वाहनाचे मोठे नुकसान झाले असून वाहनाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.
हेही वाचा: Pune Accident : सिंहगड रस्त्यावरील अपघातात तरुणीचा मृत्यू; पीएमपी बसमधून पडली अन् थेट…
सहा जणांचा जागीच मृत्यू
अपघाताची तीव्रता लक्षात येताच घटनास्थळी मदतकार्य सुरू करण्यात आले. वाहनात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. या दुर्घटनेत सहा जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर सात प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा आणि मदत पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता. वाहनांचा अपघातग्रस्त भाग हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे काम करण्यात आले.
हेही वाचा: जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू
मृत प्रवाशी मध्य प्रदेशातील असल्याची माहिती
दरम्यान, अपघातातील मृत प्रवासी मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, मृत आणि जखमींची अधिकृत ओळख प्रशासनाकडून जाहीर होणे बाकी आहे. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, ट्रकचा वेग किती होता तसेच चालकाचे नियंत्रण का सुटले, याबाबत संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. या भीषण अपघातामुळे गोंदिया-बालाघाट महामार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अपघाताची अधिकृत माहिती आणि मृत-जखमींची ओळख प्रशासनाच्या पुढील तपासानंतर स्पष्ट होणार आहे.