जळगाव: बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असतानाच आता जळगावातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील कानसवाडा गावात माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. दिवसाढवळ्या चॉपर आणि चाकूने भोसकून त्यांचा खून करण्यात आल्यामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
हत्या झालेल्या माजी उपसरपंचांचे नाव युवराज सोपान कोळी असे असून, ते शिवसेना शिंदे गटाचे नेते होते, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली असून, गावातीलच तीन जणांनी त्यांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्रत्यक्षदर्शींनी घटनेची माहिती पोलिसांना दिली असून, जळगाव पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. या हत्येमागील कारण स्पष्ट झाले नसले तरी पोलिस विविध दिशांनी तपास करत आहेत.
जळगाव जिल्ह्यातील कानसवाडा गावात माजी उपसरपंच युवराज कोळी यांची निर्घृण हत्या करण्यात आली. आज सकाळी ८ च्या सुमारास गावातीलच तिघांनी धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला. चाकू आणि चॉपरने वार करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले, ज्यामुळे अतिरक्तस्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव शासकीय व वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला आहे. यावेळी रुग्णालयाबाहेर त्यांच्या नातेवाईकांनी जोरदार आक्रोश व्यक्त केला. या घटनेमुळे कानसवाडा गावासह जिल्हा रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण आहे. युवराज कोळी यांची हत्या नेमकी का करण्यात आली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, हत्या केल्यानंतर तिन्ही मारेकरी फरार झाले असून, पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू केली आहे. संशयित आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.