Amitesh Kumar press conference in pune on swargate molestation case
पुणे : पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये असणाऱ्या स्वारगेट बसस्थानकावर 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला. 100 मीटरवर पोलीस स्टेशन असून देखील ही घटना घडल्यामुळे संपूर्ण राज्यातून रोष व्यक्त करण्यात येत होता. स्वारगेटमधील शिवशाही बसमध्ये या तरुणीवर अत्याचार केला. स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपीची ओळख पटली. दत्तात्रय गाडे या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी जंग जंग पिछाडले होते. 48 तास उलटून गेल्यानंतर आरोपी सापडत नसल्यामुळे पुणे पोलिसांवर मोठा दबाव होता. पोलिसांची 11 पथके आरोपीचा शोध घेत होती. यानंतर अखेर शिरुरमधील गुणाट या त्याच्या गावीच आरोपी पोलिसांच्या हाती आला. यानंतर आता पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आरोपीची माहिती देणाऱ्या गावकऱ्यांचा सत्कार करणार असल्याचे देखील जाहीर केले आहे.
अमितेश कुमार यांनी पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणावर माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आरोपी दत्तात्रय गाडे याची रुग्णालयामध्ये चाचणी करण्यात येईल. तसेच पुढील तपासासाठी विशेष पथक तयार केले जाईल. सर्व प्रकारे पुरावे गोळे करुन एक सशक्त केस तयार केली जाणार आहे. यामध्ये स्पेशल कॉउन्सिलची नियुक्ती करण्यात येणार आहे. या केसमध्ये फास्ट ट्रॅकमध्ये पुढे जाऊन आरोपीला शिक्षा देण्यासाठी सर्व प्रयत्न केले जाणार आहे. या व्यक्तिरिक्त महिलांच्या सुरक्षेबाबत शहराचा एक विस्तृत आढावा घेण्यात आला आहे. निर्जनस्थळी, बसस्थानक, रेल्वे स्थानके, डार्क स्पॉट आणि हॉट स्पॉट असतील याचे ऑडिट सुरु आहे. महानगरपालिका सोबत हे काम केले जाणार आहे. शहरातील लाईट्स वाढवण्यावर भर दिला जाणार आहे,” अशी माहिती आयुक्तांनी दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे पोलीस आयुक्तांनी तपास कशा पद्धतीने केला याची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, “फिर्याद आल्यानंतर दीड ते दोन तासांमध्ये वेगवेगळ्या टीम तयार झाल्या. बसस्थानकाच्या आवारातील 23 सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज चेक करण्यात आले. 48 कॅमेऱ्याचे फुटेज हे शहराच्या विविध भागातील चेक करण्यात आले. त्याच्या गावामध्ये पोलीस दाखल झाले होते. काल शेवटी आरोपी भेटला. गावातील लोकांचे पुणे पोलीस दलाकडून धन्यवाद मानतो. आम्ही स्वतः त्या गावामध्ये भेट देणार आहोत. तसेच आरोपीला पकडण्यामध्ये मदत करणाऱ्या गावकऱ्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. ज्यांनी शेवटची महत्त्वाची माहिती दिली त्यांना 1 लाख रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे,” अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुणे पोलीस आयुक्त पुढे म्हणाले की, “घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. शहरातील नागरिकांची सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जात आहे. आरोपीला कडक शिक्षा देण्यासाठी पोलीस दल प्रयत्नशील राहिल. तपास अजून सुरु आहे. आरोपीची प्राथमिक आरोग्य तपासणी झाली आहे. यामध्ये त्याच्या गळ्यावर काही दोरीची निशाण आहेत. त्यामुळे आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा देखील अंदाज व्यक्त केला जात आहे. दोरी तुटल्यामुळे आणि लोक जमा झाल्यामुळे आत्महत्या करता आली नाही, असे त्याने सांगितले आहे. हे प्राथमिक माहितीमध्ये आरोपीच्या गळ्यावर आत्महत्येच्या खुणा असल्याचे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले आहे.