अवैध धंद्यांविरोधात अमरावती पोलिस 'अॅक्शन मोड'वर; भजनी मंडळाच्या वेशात आलेल्या पोलिसांनी जुगार अड्डाच केला उद्ध्वस्त
मोर्शी : अमरावतीत अवैध धंद्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे अनेक कारवाईतून स्पष्ट झाले आहे. त्यातच आता शिरखेड पोलिसांनी धामणगाव येथे एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कौशल्यपूर्ण कारवाई करत एकूण १ लाख ५४ हजार ९५० किमतीचा मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे, पोलिसांनी या धाडीसाठी भजनी मंडळाचा वेश परिधान करून गावात प्रवेश केला. ही कारवाई सोमवारी (दि. ११) रात्री दहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
शिरखेड पोलिस ठाण्याचे ठाणेदार सचिन लुले यांना धामणगाव येथे एका बंद घरात दीर्घकाळापासून जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. मात्र, जुगारी गावाच्या वेशीवर खबरे ठेवत असल्याने पोलिस गावाजवळ आले की त्यांना सतर्क केले जात होते. त्यामुळे थेट कारवाई करणे कठीण झाले होते. सोमवारी रात्री पुन्हा जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या आदेशानुसार, ठाणेदार लुले यांनी एक युक्ती आखली. पथकाने भजनी मंडळाचा वेश धारण करून पायी गावात प्रवेश केला.
संशय न येता पोलिस थेट जुगार अड्ड्यावर पोहोचले आणि तेथे चालू असलेल्या पत्त्यांच्या खेळावर धाड टाकली. या कारवाईत १३ जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडले गेले. घटनास्थळावरून ७ अँड्रॉईड मोबाईल, १ साधा मोबाईल, १ मोटरसायकल, जुगार साहित्य आणि रोकड असा एकूण १ लाख ५४ हजार ९५० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला.
हेदेखील वाचा : Nanded Crime: नांदेडमध्ये जादूटोणा! चोरीच्या संशयावरून दोघांना खाऊ घातला मंतरलेला नागेलीच्या पानाचा विडा
ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये रुपेश विनायकराव गावंडे (२५), संतोष सदाशिवराव गावंडे (३५), मोहन राजू बरडे (३०), विक्की गजानन कनेर (२२), रविंद्र मधुकर आकोलकर (४१), योगेश वासुदेवराव झगडे (३०), देवेंद्र वासुदेवराव मानकर (२५), रुपेश सुरेशराव ढाकुलकर (३०), विजय पुंडलिकराव भुजाडे (३८), मनोज सुधाकरराव वैराळे (३९), विनोद रमेशराव वैराळे (३९), सुनिल भाऊराव सुंदरकर (६०), प्रज्वल विलासराव अमृते (२३), (सर्व रा. धामणगाव काटसुर, ता. मोर्शी, जि. अमरावती) यांचा समावेश आहे.