संग्रहित फोटो
संशयिताची ओळख पटली
सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शॉपिंग कॉम्प्लेक्ससमोर वृद्धाचा मृतदेह पडलेला एका नागरिकाच्या निदर्शनास आला. त्याने तत्काळ डायल ११२ वर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मध्यवर्ती परिसरातील घटना असल्याने पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. दरम्यान, गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक अमोल देशमुख, विशाल सोनवणे व त्यांच्या पथकाने घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. फुटेजच्या आधारे संशयिताची ओळख पटली. त्यानंतर त्याचा शोध घेत पोलिसांनी गणेश कॉलनीतील पंचायत समिती परिसर गाठला आणि अकबर ऊर्फ बंटीला ताब्यात घेतले.
‘त्या’ मृताची ओळख पटेना..!
प्राथमिक चौकशीत अकबर हा नशेच्या आहारी गेलेला असल्याचे समोर आले. रात्रीच्या वेळी त्याचा मृत भिक्षेक-याशी दारुपिण्यावरुन वाद झाला होता. वाद विकोपाला गेल्यानंतर संतापलेल्या अकबरने वृद्धाच्या वॉकरनेच त्यांच्या डोक्यात प्रहार केल्याचे तपासात समोर आले. गंभीर दुखापतीमुळे वृद्धाचा मृत्यू झाला. मृत वृद्धाची अद्याप ओळख पटलेली नाही. सिडको पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून, उत्तरीय तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तो होता माफीचा साक्षीदार
अकबर ऊर्फ बंटी अजीम पठाण हा सेंट्रिंगचे काम करतो. तो सराईत असून, २०२२ मध्ये टीव्ही सेंटर परिसरात झालेल्या एका खुनाच्या गुन्ह्यात माफीचा साक्षीदार म्हणून समोर आला होता. अन्य एका गुन्ह्यात तो १८ महिने कारागृहात राहून आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक अमोल देशमुख यांनी दिली.
अशी केली पोलिसांनी अटक
घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी अकबर ऊर्फ बंटीचा शोध सुरू केला. तो कोठे लपण्याची शक्यता आहे, याचा अंदाज घेत पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे गणेशनगरातील पंचायत समिती परिसर गाठला. त्यावेळी अकबर ऊर्फ बंटी हा नशेच्या अवस्थेत एका झाडाखाली झोपलेला आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत सिडको पोलिसांच्या स्वाधीन केले. अशी माहिती सहायक निरीक्षक अमोल देशमुख यांनी ही माहिती दिली.






