
Beed Crime News: गायी-म्हशी खरेदीसाठी १० लाखांची मागणी; हुंड्याच्या छळाला कंटाळून बीडमधील २५ वर्षीय विवाहितेचा मृत्यू
विवाहानंतर काहीच दिवसात पैशांची मागणी
मयत विवाहितेचे नाव ऋतुजा असून, ती अंबाजोगाई तालुक्यातील तळणी येथील रहिवासी गोविंद आण्णा गित्ते यांची मुलगी होती. तिचा विवाह केज तालुक्यातील बँकनांजा येथील अंकुश जनार्दन नागरगोजे याच्यासोबत झाला होता. विवाहानंतर सुरुवातीच्या काळात सर्व काही सुरळीत असल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. मात्र, काही काळानंतर सासरच्या मंडळींकडून पैशांची मागणी सुरू झाल्याचा आरोप आहे.
पैशांच्या मागणीतुन मानसिक आणि शारीरिक छळ
गायी आणि म्हशी खरेदी करण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये घेऊन यावेत, अशी मागणी ऋतुजाकडे करण्यात आली. ही मागणी पूर्ण न झाल्याने तिचा वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याचे तिचे वडील गोविंद गित्ते यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पैशांच्या मागणीवरून तिला मारहाणही करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
उपचारातच झाला मृत्यू
ऋतुजाने विषारी पदार्थ सेवन केल्याची घटना घडली. प्रकृती खालावल्याने तिला प्रथम धारूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.
पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
या घटनेनंतर ऋतुजाचे वडील गोविंद गित्ते यांनी युसूफ वडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पती अंकुश जनार्दन नागरगोजे याच्यासह सासरे, सासू, दीर आणि नणंद अशा पाच जणांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋतुजाच्या मृत्यूमागे हुंड्याची मागणी आणि सासरच्या मंडळींकडून झालेला कथित छळ कितपत कारणीभूत आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. तक्रारीतील आरोपांची सत्यता तपासाच्या माध्यमातून स्पष्ट होणार आहे. या प्रकरणातील संबंधित व्यक्तींची चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. हुंड्याच्या मागणीमुळे विवाहित महिलांवर होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात दोषींवर काय कारवाई होते, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.