आधी गळा दाबला आणि मग लोखंडी रॉडने मारहाण
काशीमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सोसायटीतील क्षुल्लक कारणावरुन वृद्धाला मारहाण
मिरा रोड / विजय काते : मिरा भाईंदर परिसरात दिवसेंदिवस विकृती वाढत असल्याच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत. भर दिवसा खुलेआमपणे एका वृद्ध व्यक्तीला आणि त्याच्या मुलीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. कबुतरांमुळे होणाऱ्या आजारांबाबत जनजागृती असतानाही, सार्वजनिक परिसरात कबुतरांना दाणे टाकण्यावरून मिरा रोडमध्ये गंभीर वाद निर्माण झाला आहे. एका वृद्ध नागरिकाने कबुतरांना दाणे टाकण्यास अडवल्याने त्याला आणि त्याच्या मुलीला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी सकाळी घडली असून, काशिमीरा पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी सकाळी डीबी ओझोन इमारत क्र. ३० मध्ये राहणारे ६९ वर्षीय महेंद्र पटेल हे दूध आणण्यासाठी गेले होते. त्यांच्या बाजूच्या इमारत क्रमांक २९ मध्ये राहणाऱ्या आशा व्यास (६५) या महिला सार्वजनिक जागेत कबुतरांना दाणे टाकत होत्या. त्यावरून महेंद्र पटेल यांनी विचारणा केली असता, त्यावेळी शाब्दीक बाचाबाची झाली. गोंधळ ऐकून पटेल यांची मुलगी प्रेमल पटेल ही इमारतीच्या खाली येवून, वडीलांना शिव्या का देता असं विचारणा केल्यावर, २९ क्रमांकाच्या व्यास यांच्या इमारतीत राहणारे सोमेश अग्निहोञी आणि दोन अनोळखी इसमांनी प्रेमल यांना लोखंडी रॉडने मारले तर दुस-याने त्यांचा गळा दाबल्याची प्रेमल हीने तक्रार दिली.
या प्रकरणी आशा व्यास,सोमेश अग्निहोञी आणि अन्य दोन अनोळखी लोकांवर बीएनएस ११८ (८) ११५(२) आणि ३५२ प्रमाणे काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्वांनी पोलिसांनी नोटीस दिली असल्याची माहिती काशिमिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे यांनी दिली आहे.