सतीश वाघ खूनप्रकरणी मोठी माहिती समोर; पत्नीचे अनैतिक संबंध की....
पुणे : पुण्यात भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती, त्या हत्येचा उलगडा करण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे. सतीश वाघ यांच्या पत्नीनेच मोहिनी वाघने आरोपींना पाच लाखांची सुपारी देण्याची तयारी दाखवून त्यांची हत्या घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तपासात समोर आला आहे. खुनाच्या सुपारीसाठी ठरलेल्या रकमेपैकी मोहिनी वाघ हिने किती पैसे अक्षय जावळकरला दिले. पैसे कशा प्रकारे दिले यासह सतीश वाघ यांचा खून करण्यामागे नेमके आर्थिक कारण आहे की अनैतिक संबंध याचा तपास पोलीस आता तपास करत असून, त्यातून आणखी काय सत्य बाहेर येते याकडे हडपसरसह पुण्याचे लक्ष लागले आहे.
शेतकरी तसेच हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ यांच्या खूनप्र करणात त्यांची पत्नी मोहिनी वाघला अटक केली. पत्नीने पती सतीश यांच्या खुनाची सुपारी दिल्याचे तपासातून स्पष्ट झाले. अटकेनंतर गुरुवारी मोहिनी हिला न्यायालयात हजर केले होते. मोहिनी हिच्या सांगण्यावर अक्षय याने त्याच्या साथीदार आरोपींना वाघ यांना मारण्यासाठी पाच लाख रुपयांची सुपारी दिलेली होती. ही घटना ही पती-पत्नीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी आहे आहे, अशी माहिती गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी न्यायालयास दिली.
मोहिनी आणि इतर आरोपींनी नेमका कोणत्या कारणासाठी गुन्हा केला आहे? गुन्ह्यात मुख्य सूत्रधार नक्की कोण आहे ? गुन्ह्यात वापरलेले हत्यार आरोपींनी नक्की कोठून आणले? आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत काय? याबाबत त्यांना एकत्रितरित्या तपास करायचा आहे. त्यामुळे आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
हत्यार भीमा नदीत टाकले
नवनाथ गुरसाळे व त्याचा साथीदार अतिश जाधव या दोघांनी वाघ यांच्या खुनासाठी वापरलेले हत्यार हे पेरणे फाटा येथे भीमा नदी पात्रात टाकले. दोन्ही आरोपींच्या माध्यमातून हत्यारांचा शोध घेऊन ते जप्त करायचे आहे, असे गायकवाड यांनी न्यायालयास सांगितले.
इतर आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी
पवन श्यामसुंदर शर्मा (वय ३०, रा. लक्ष्मी हाईट्स, काळुबाई नगर, आव्हाळवाडी), नवनाथ अर्जुन गुरसाळे (वय ३१, रा. गणेश नगर, डोमखेल रोड, वाघोली, मुळ रा. बीड), विकास ऊर्फ विक्की सीताराम शिंदे (वय २८, रा.बाजार तळ्याशेजारी आव्हाळवाडी रोड, वाघोली, मुळ रा. अहिल्यानगर) आणि अक्षय ऊर्फ सोन्या हरीश जावळकर (वय २९, रा. फ्लॅट नंबर ३०५ विघ्नहर्ता सोसायटी, शामचंद्र पार्क, फुरसुंगी फाटा) यांना यापुर्वी अटक केली होती. आरोपींच्या पोलिस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. तर अतिश जाधवला ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी मोहिनी, जाधव आणि यापूर्वी अटक केलेले आरोपी या सर्वांचा एकत्रित तपास करायचा असल्याने आता सर्वांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.