पाळण्याच्या दोरीचा फास बसल्याने बालकाचा मृत्यू; खेळता-खेळता घडली घटना अन्...
अमरावती : शेजारच्या बाळासोबत खेळायला गेलेल्या एका दहा वर्षीय बालकाचा पाळण्याच्या दोरीचा गळफास लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. नमन नितीन निंभोरकर (वय 10, रा. चिचफैल लाईन नं. 2. रुख्मिमीनगराजवळ) असे मृत बालकाचे नाव आहे. दोरीच्या पाळण्याने गळफास लागल्याची ही घटना शुक्रवारी (दि. 21) राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. त्यानंतर या बालकाचा बुधवारी (दि. 26) उपचारादरम्यान मृत्यू झाला.
नमन निंभोरकर हा शेजारी राहणाऱ्या बाळाकडे दररोज खेळायला जात होता. दरम्यान बाळाला खेळवता-खेळवता तो पाळण्यावर झोके सुध्दा घेत होता. 21 फेब्रुवारी रोजी नमन हा नेहमीप्रमाणे बाळासोबत खेळण्याकरिता शेजारी गेला होता. दरम्यान, पाळण्यात झोका घेत असताना, त्याला दोरीचा गळफास बसला. त्यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या एका लहान मुलीला हा प्रकार दिसला. तिने तत्काळ नमनच्या घरी धाव घेऊन याबाबतची माहिती दिली. त्यानंतर नमनचे आई-वडिल शेजारी धावून गेले.
त्यावेळी नमन हा बेशुध्द पडला होता. त्यांनी तत्काळ नमनला एका खासगी रुग्णालयात उपचाराकरिता नेले. त्याच्यावर डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरु केले. चार दिवस त्याच्यावर उपचार सुरु होते. अशातच बुधवारी नमनची प्राणज्योत मालवली. या घटनेच्या माहितीवरून राजापेठ पोलिसांनी रुग्णालयात जाऊन माहिती घेतली.
दहा वर्षीय मुलगा हा 21 फेब्रुवारीलाही घरी खेळण्यासाठी गेला होता. तो तेथील पाळण्यावर झोके घेत होता. दरम्यान त्याला दोरीचा फास बसला. त्याला कुटुंबीयांनी उपचाराकरिता खासगी रुग्णालयात नेले होते. त्याची प्राणज्योत बुधवारी मालवली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू
जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांचे सत्र सुरुच आहे. बुधवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास तेजेवाडी येथे वीटभट्टी मजुराच्या 9 वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रुपेश तानाजी जाधव असे मृत बालकाचे नाव आहे. दोनच दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील म्हैसगाव येथून तो आपल्या आजोबांकडे आला होता. या घटनेने तालुक्यांत पुन्हा भितीचे सावट पसरले आहे.
जुन्नर तालुका बिबट प्रवण क्षेत्र
जुन्नर तालुका हा बिबट प्रवण क्षेत्र असून, आता तर बिबट समस्येने उग्र रूप धारण केले आहे. शासन मात्र या प्रश्नी पूर्णपणे उदासीन दिसत आहे. मृतांच्या नातेवाईकांना मदत देणे, जखमींना आर्थिक मदत करणे, यापलीकडे वनविभाग देखील काही करत नसल्याचे दिसून येते. 2021 साली जुन्नरजवळील हापुसबाग शिवारात अक्षय हा बिबट्याने घेतलेला तालुक्यातील पहिला बळी ठरला.