Crime News: पुरंदरमध्ये वाहतायेत गावठी दारूचे पाट; बेकायदेशीर धंद्याचे जाळे वाढले, पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
सासवड /संभाजी महामुनी: पुरंदर तालुक्यात गावोगावी आणि गल्ली बोळात गावठी हातभट्टीच्या दारूचे अक्षरशः पाट वाहत आहेत. पोलिसांना वारंवार विनंती आणि तक्रार अर्ज करूनही केवळ कागदोपत्री कारवाई दाखवली जाते आणि दुसऱ्याच दिवशी धंदे पुन्हा पूर्ववत अशीच स्थिती आहे. एवढेच नाही तर दिवे घाट पासून जेजुरी आणि बोपदेव घाट पासून सासवड पुढे वाघापूर रोड, पारगाव रोड, केतकावळे रोड आणि वीर परिंचे रस्त्यावर सर्व हॉटेल मधून सरसकट दारू विक्री जोरात सुरु आहे. मात्र पोलिसांचे आर्थिक हितसंबंध आणि हप्ते खोरी पद्धतीमुळे बेकायदेशीर व्यवसायांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून अक्षरशः जाळे निर्माण झाले आहे.
सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी, मारामारी हे नित्याचेच झाले आहे. आता गुन्हेगारांनी थेट पिस्तुलानेच गोळीबार करण्याचा फंडा वापरला असून यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत. पुरंदर तालुक्यात बेकायदा सावकारकी जोरात सुरु असून त्यांच्यावर कायद्याचा कोणताही धाक राहिला नाही. बोअरिंगचा व्यवसाय करणाऱ्यांवर काडतुसे बाळगण्यासाठी कोणतेही निर्बंध राहिलेले नाहीत. तालुक्यात ग्रामीण भागात रात्री सुरुंगाचे स्फोट ऐकायला मिळत आहेत. तर भर रस्त्यावरून काडतूसांची वाहतूक करताना दिसून येत आहेत. सातारा, फलटण, लोणंद वरून पुण्याकडे जाणारे गोमांस सासवड मधूनच वाहतूक होत सासवड पोलिसांना एकही गाडी दिसून येत नाही याबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पोलिसांना गोपनीय खबर देणाऱ्याचे नाव गुन्हेगारांकडे तत्परतेने
शहरात आणि तालुक्यात कायदा, सुव्यवस्था आणि शांतता अबाधित राहण्यासाठी तसेच गुन्हेगारांची माहिती मिळण्यासाठी अनेक वर्षापासून स्थानिक गावातील खबरे माहिती पुरवत असत. त्यांच्यामुळे अनेक गुन्ह्यांची उकल होत असे. आणि त्याबदल्यात खबऱ्याना शासनाकडून सन्मानित केले जायचे. मात्र सध्याच्या परिस्थितीत पोलीस हेच गुन्हेगारांसाठी खबऱ्याची भूमिका बजावत आहेत. एखाद्या भागात बेकायदेशीर व्यवसाय सुरु असेल आणि त्या गावातील व्यक्तीने पोलिसांना गोपनीय माहिती पोलिसांना दिल्यास संबधित आरोपींवर कारवाई होण्याऐवजी गुन्हेगारांना संबंधित व्यक्तीची माहिती पुरवली जाते, तुमची तक्रार आली आहे., सावध राहा असे सांगितले जाते. त्यामुळे गुन्हेगारांचे फोन संबंधित व्यक्तींना येवून थेट धमक्यांचे प्रकार घडत आहेत.
हेही वाचा: चोरट्याने ‘ॲपल’चे घड्याळ चोरले अन् घबाडच…; सासवड पोलिसांची धडक कारवाई
गावठी विषारी दारूमुळे वर्षभरात २५ ते ३० जणांचा मृत्यू
पुरंदर तालुक्यात गावठी दारू बिनधास्तपणे विकली जात आहे, तर तालुक्याचे शहर असलेल्या सासवड मध्ये या दारूचा अक्षरशः महापूर वाहत आहे. सासवड मधील दत्त नगर, इंदिरानगर, साठेनगर आणि परिसरात प्रचंड प्रमाणात दारू विकली जात आहे. यामध्ये विषारी दारू मोठ्या प्रमाणात विकली जात असून केवळ सासवड मध्ये वर्षभरात २५ ते ३० तरुण व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे विशेष म्हणजे याबाबत पोलिसांना वेळोवेळी माहिती देवूनही आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही याउलट गावठी दारूची तक्रार केली कि, हॉटेलवर कारवाई करण्याचे नाटक केले जाते. कित्येक घटनांत कारवाई करण्यासाठी चार ते पाच कर्मचारी आणि मुद्देमाल मात्र १५००, २००० एवढाच मिळतो. आणि सर्व घटनांच्या फिर्यादीत मालकाला आरोपी न करता कर्मचाऱ्याला आरोपी करून मालकाला मोकळीक दिली जाते.
हेही वाचा: सासवडमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट; उद्योजकांची घरे टार्गेटवर
सासवड पोलिसांचे डीबी पथक कुठे आहे ?
पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणतेही गुन्हे घडू नयेत आणि घडलेल्या गुन्ह्यांचा शोध घेणे, आरोपींचा शोध घेणे, त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठी विशेष डीबी ( तपास पथक ) तयार करण्यात आले आहे. मात्र सासवड पोलिसांच्या डीबी पथकाचे संपूर्ण वर्षात एकही समधानकारक काम नाही. रस्त्यावर केक कापून वाढदिवस साजरे करणे, रात्री अपरात्री कानठळ्या बसविणारे फटाके फोडणे, दुचाकी गाड्यांचे मोठाले आवाज करणे, गल्ली बोळात बेकायदेशीर दारूची विक्री, मटका, जुगार, हॉटेल मध्ये हुक्का पार्लर, मोठाल्या घरफोड्या असे सर्वच प्रकार सुरु असताना आणि सासवड मध्ये मोठ्या गुन्ह्यांतील आरोपी मोकाटपणे फिरत असताना पोलिसांचे डीबी पथक काय करीत आहे ? गुन्हेगारांचा बिमोड करण्याऐवजी त्यांनाच पाठीशी घालून नागरिकांच्या सुरक्षेची वाट लावणाऱ्या पोलिसांवर कुणाचा वरदहस्त आहे ? सासवड मध्येच वरिष्ठ पोलीस अधिकारी कार्यालय असताना त्यांना या घटनांची माहिती कशी मिळत नाही ? असे अनेक प्रश्न नागरिकांना सतावत आहेत.