ED Mumbai Raid: टोरेस कंपनी फसवणूक प्रकरणात ED ची एन्ट्री; मुंबई आणि जयपूरसह 13 ठिकाणी छापेमारी
मुंबई : मुंबईच्या मीरा-भाईंदरमधील टोरेस नावाच्या एका कंपनीत महाघोटाळा झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये गुंतवणूक योजनेत हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकल्याची बाब समोर आली आहे. टोरेस ज्वेलरी कंपनीवर हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये घेऊन फरार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या प्रकरणामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान या प्रकरणात आता ईडीने छापेमारी केली आहे. ईडीच्या पथकांनी या प्रकरणात देशभरात छापेमारी केली आहे.
टोरेस घोटाळाप्रकरणी ईडीने देशभरातील 13 ठिकाणी छापेमारी केली आहे. ईडीच्या पथकांनी मुंबई आणि जयपूरमध्ये ही कारवाई केली आहे. मुंबईतील 10 ठिकाणी आणि जयपूरमधील 3 ठिकाणी ईडीने कारवाई केली आहे. ईडीने मुंबई, ठाणे, कल्याण अशा टोरेसच्या ऑफिसमध्ये छापेमारी केली. या कारवाईत ईडीने डिजिटल आणि कागदपत्र अशा स्वरूपाचे पुरावे जप्त केले आहेत. त्यामुळे या प्रकरणात आता काय होणार याकडे सर्व गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. हे प्रक्ररण नक्की काय हे ते जाणून घेऊयात.
नेमके प्रकरण काय?
मुंबईच्या मीरा-भाईंदरमधील टोरेस नावाच्या एका कंपनीत महाघोटाळा झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये गुंतवणूक योजनेत हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकल्याची बाब समोर आली आहे. कंपनीचे मीरा-भाईंदरचे आऊटलेट सोमवारी अचानक बंद झाल्याने दुकानाबाहेर गुंतवणूकदारांची गर्दी झाली होती. यासंदर्भात कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधीशी संपर्क होऊ शकला नाही. कंपनीशी संबंधित एका महिलेने सांगितले की, वेबसाईटमधील तांत्रिक अडचणींमुळे गुंतवणूकदारांचे परतावे त्यांना पाठवले जात नाही. 2023 मध्ये नोंदणीकृत ‘प्लॅटिनम हरेन प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीने 2024 मध्ये ‘टोरेस’ ब्रँड अंतर्गत दादरमध्ये 30 हजार स्क्वेअर फुटांचे आउटलेट उघडले. यानंतर कंपनीने मीरा-भाईंदरसह इतर ठिकाणी आऊटलेट्स उघडले. कंपनीने सोने, चांदी आणि मॉइसॅनाइट दगड (लॅबने तयार केलेले हिरे) खरेदीवर त्याच रकमेवर अनुक्रमे 48, 96 आणि 520% वार्षिक परतावा देण्याचे वचन दिले. रिटर्न साप्ताहिक भरले जात होते. दोन आठवडे परतावा न मिळाल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
हेही वाचा: मुंबईत टोरेस कंपनीचा महाघोटाळा; दादरमध्ये आउटलेट उघडलं, गुंतवणुकीच्या नावावर कोट्यवधींची फसवणूक
कोट्यवधी रुपये बुडाण्याची शक्यता
या योजनेबाबत काही आठवड्यांपूर्वी पोलिस प्रशासनाकडे तक्रार केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, अलीकडेच एकाने मित्राच्या सांगण्यावरून 6 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. त्याच्या मित्रानेही नऊ लाख रुपये गुंतवले होते. त्याला दर आठवड्याला 48 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, पण दोन आठवडे पैसे आले नाहीत. त्यामुळे गुंतवणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
काही महिन्यांपूर्वीच कंपनीची स्थापना
काही महिन्यांपूर्वी या ज्वेलरी कंपनीची दादरमध्ये स्थापना झाली. पैसे दामदुप्पट करून देण्याच्या स्कीम आखल्या होत्या. यामध्ये लोकं हळूहळू समाविष्ट झाले. तुमचे पैसे एक आठवड्यात 7 टक्क्यांनी वाढतील अशी हमी होती. लोकांना 2 महिने 7 टक्क्यांनी पैसे मिळत होते आणि ही टीम इतकी हुशार होती की ॲपद्वारे तुम्ही टाकलेले पैसे हे कधी मॅच्युअर होणार आणि किती होणार हे लोकं कधीही पाहू शकतं होते.