Jamkhed Accident: बोलेरो कार खडीवरून घसरली अन् थेट... ; चार जणांनी गमावला जीव
जामखेड: जामखेड तालुक्यातील जांबवाडी रस्त्यावर आज भीषण अपघात घडला असून, बोलेरो वाहन रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे नियंत्रण सुटून तेथील विहिरीत पडले. अचानक झालेल्या घटनेने सर्वांचे मन हेलावून टाकले आहे. या घटनेत चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याबाबतची समजलेली माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील जांब गाव रस्त्यावर बोलेरो गाडीचा रस्त्यावर पडलेल्या खडीवरुन गाडीचे नियंत्रण सुटल्याने चारचाकी वाहन शेजारील विहिरीत कोसळून भीषण अपघात घडला आहे.
बोलोरो वाहन जांबवडी गावाच्या दिशेने जामखेडच्या दिशेने जात होते. जामखेड – जांबगाव रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खडीवरून गाडी गेल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अचानक गाडीवरील नियंत्रण सुटले व बोलेरो गाडी रस्त्यालगत असलेल्या विहिरीत जाऊन पडली. या घटनेमुळे अपघातस्थळी एकच खळबळ उडाली.अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी तत्काळ घटनास्थळी रुग्णवाहिकेसह धाव घेतली. तत्काळ विहिरीत पडलेल्या प्रवाश्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. ग्रामस्थ, पोलीस प्रशासनाच्या मदतीने अपघातग्रस्तांना विहिरीतून बाहेर काढले. विहिरीतून बाहेर काढलेल्या जखमींना तत्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, या चौघांचाही जागीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक शिंदे यांनी घोषित केले.
घटनेनंतर रस्त्यावरील पडलेल्या खडीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर!
दरम्यान या घटनेने रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. रस्त्यांची दुरावस्था आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे निष्पाप लोकांना प्राण गमवावे लागत आहेत. या दुर्घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सामाजिक कार्यकर्ते कोठारी यांनी रस्त्यांच्या कामासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात केली असून अधिक तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील तपास करीत आहेत.
अपघातात मृत झालेल्या व्यक्तींची नावे
या अपघातात रामहरी गंगाधर शेळके, अशोक विठ्ठल शेळके, किशोर मोहन पवार, चक्रपाणी सुनील बारस्कर (सर्व रा. जांबवाडी, ता. जामखेड) हे मृत्युमुखी झाले आहेत. सदर चारचाकी वाहन विहिरीत पडलेले असल्याने ते बाहेर काढल्यानंतर वाहनाचा क्रमांक व अधिकची माहिती मिळू शकेल.
हेही वाचा: Pune Accident : भरधाव कारची दुचाकीला धडक; दीर- भावजयचा मृत्यू
भरधाव कारची दुचाकीला धडक
पुण्यातील जेल रोडवरील एका रुग्णालयासमोर भरधाव कारने दिलेल्या धडकेत दीर भावजयीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोहगाव परिसरातील जेल रस्त्यावरील संजय पार्क येथे हा अपघात गुरूवारी सकाळी झाला. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशीर्वाद गोवेकर (वय ५२), रेश्मा गोवेकर (वय ४७) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी कारचालक अचलकुमार (वय ४३) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत प्रसाद गोवेकर (वय ५४, रा. शिव पार्वती मंगल कार्यालयाजवळ, गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.