‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
अस्लम चांदपाशा शेख (रा. खाजा नगर, धाराशिव) आणि एसआयओ धाराशिवचे सदस्य निहाल सिकंदर शेख (रा. सुलतानपुरा, येडशी रोड, धाराशिव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत दहशतवाद विरोधी पथक, छत्रपती संभाजीनगर युनिटच्या धाराशिव कॅम्पमधील फयाजोद्दीन गयासोद्दीन काझी (वय ४९) यांनी २ सप्टेंबर रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादीनुसार, ८ मार्च २०२५ ते २ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आरोपींनी संगनमत करून एसआयओ धाराशिवच्या सोशल मीडिया अकाउंटचा वापर केल्याचा आरोप आहे. संस्थेच्या नावाने ‘जकात’ व देणगी देण्याचे आवाहन करून नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात आला. मात्र, संस्थेच्या अधिकृत बँक खात्यावर देणगी स्वीकारण्याऐवजी आरोपींनी स्वतःच्या वैयक्तिक बँक खात्यांवर पैसे जमा करून घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
यासाठी विविध मोबाईल क्रमांक, यूपीआय आयडी तसेच क्यूआर कोडचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच संबंधित मोबाईल क्रमांक सोशल मीडियावर प्रसारित करून त्याद्वारे निधी जमा करण्यात आल्याचेही पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(२), ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
‘जकात’ म्हणजे इस्लाम धर्मातील पाच मुख्य कर्तव्यांपैकी (स्तंभांपैकी) एक, ज्याचा मुख्य उद्देश श्रीमंतांच्या संपत्तीचा काही भाग गरजू आणि गरिबांना देणगी म्हणून देणे हा आहे. ‘जकात’ या अरबी शब्दाचा अर्थ ‘शुद्ध करणे’ असा होतो. आपल्या हक्काच्या कमाईतून ठराविक हिस्सा गरिबांना दिल्यास उरलेली संपत्ती पवित्र होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
Pune Crime News: विद्यानंद बापट यांना मारहाण करणारा नेमका कोण? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर






