दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी अटकेत
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात नाशिकरोड, पळसे शिवारात सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघांच्या टोळीचा मध्यरात्रीच्या सुमारास नाशिकरोड पोलिसांनी थरारक पाठलाग करून मक्याच्या शेतातून चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ 28 धारदार चाकू, कोयता व मिरचीची पूड आढळून आल्याने पोलिसांना त्यांचा डाव उधळून लावला.
पळसे गावाचे पोलीस पाटील सुनील गायधनी यांना गुरूवारी (दि. २१) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गावात काही संशयित फिरत असल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ पोलिसांच्या ११२ मदत कक्षाला दूरध्वनीवरून याची खबर दिली. तेव्हा नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितेंद्र सपकाळे यांनी गुन्हे शाखेच्या मदतीने मध्यरात्री पळसे गावाच्या ज्ञानेश्वर गायधनी यांच्या मकाच्या शेतामध्ये संशयितांचा शोध घेतला असता पाच संशयित पळून जावू लागले.
पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यापैकी चौघांना ताब्यात घेण्यात आले. त्यात रवि कुमार भोई (रा. अंबरनाथ), शिवा विक्रम वैदू (रा. जळगाव), विष्णू शंकर भोई (रा. कल्याणफाटा), आकाश गोपाळ वैदू (रा. पाचोरा) यांचा समावेश आहे. त्यांचा एक साथीदार श्याम विष्णू भोई (रा. सामनगावरोड) हा मात्र अंधाराचा फायदा घेवून पळून गेला.
एक संशयित पळून जाण्यात यशस्वी
दरम्यान, पोलिसांनी पाठलाग करून चौघांना ताब्यात घेतले असले तरी एक जण मात्र रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत आहे. परिसरात कुणालाही संशयित व्यक्ती आढळला किंवा अशी काही हालचाल दिसून आली तर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पिंपरीत टाकला दरोडा
काही दिवसांपूर्वी, पिंपरी शहरातील प्रतिष्ठित आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या निगडी प्राधिकरण परिसरात, बंगल्यात घुसून वृद्ध नागरिकाचे हातपाय बांधून, पिस्तूलाचा धाक दाखवत दरोडा टाकणार्या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तब्बल 1200 किलोमीटर पाठलाग करत राजस्थानमधून मुख्य आरोपींना अटक केली असून, तिसऱ्या स्थानिक आरोपीला तळेगाव येथून पकडले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने ही कामगिरी केली आहे.