पुण्यात टोळीयुद्ध; महाळुंगेमध्ये स्टील उद्योजकावर अज्ञातांकडून गोळीबार
पिंपरी : चाकणजवळील महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका स्टील कंपनीच्या मालकावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. ही घटना सोमवारी (दि. २०) सकाळी घडली. आरोपी हेल्मेट घालून दुचाकीवरून आले होते. अचानक स्टील कंपनीच्या मालकासमोर येत फायरिंग केली. त्यानंतर आरोपींनी वराळे ते भांबोली या दिशेने पलायन केले आहे. उद्योजकांवर झालेल्या गोळीबाराची दखल वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी घेतली असून त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
सर्व हद्दीत नाकाबंदी
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सर्व हद्दीत नाकाबंदी लावण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस नियंत्रण कक्षालाही याबाबत कळविण्यात आले आहे. पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिसांनाही या गोळीबाराबाबत कळविण्यात आले आहे. खेड आणि शिक्रापूर परिसरातही नाकाबंदी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गोळीबार व्यावसायिक वादातून झाला की अन्य कारणावरून झाला याबाबतचे नेमके कारण आणि आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे. पोलिसांकडून आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली जात आहे.
सासवडमध्ये हॉटेल निसर्गच्या मालकांवर हल्ला
पुण्यामध्ये सध्या खुनाचे मोठे गुन्हे घडत असल्याचे दिसून येत आहे. असाच प्रकार पुरंदर तालुक्यात पाहायला मिळाला. पुरंदर तालुक्यातील भिवरी येथे हॉटेल निसर्गचे मालक मालक अनिकेत रामदास कटके आणि कैलास वांढेकर यांना सात जणांनी टिकावाच्या लाकडी दांडक्याने व लोखंडी हत्याराने जिवघेणा हल्ला करून हॉटेलचे नुकसान केले. तसेच काऊंटरमधून १८,३०० रुपये जबरदस्तीने काढुन घेऊन फरार झाले. याबाबत सासवड पोलिसांत फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना जेरबंद करून त्यांची तुरुंगात रवानगी केली आहे. दरम्यान दुचाकी लावण्याच्या कारणावरून मारहाण केल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते. परंतु त्यांचा हॉटेलवर दरोडा टाकण्याचा मुख्य उद्देश होता. मात्र त्यास विरोध झाल्यानेच मारहाण करून रक्कम लुटून नेली. अशी माहिती पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली आहे.
दोन अल्पवयीनांसह सात जणांना अटक
या घटनेत अनिकेत रामदास कटके आणि कैलास वांडेकर जखमी झाले असून कैलास वांढेकर यांच्यावर खासगी रुग्णालयात अद्यापही उपचार सुरु आहेत. याप्रकरणी प्रेम उर्फ दत्ता राजु शेलार, अर्जुन महादेव शेलार, विशाल चव्हाण, शुभम जाधव सर्वजण( रा. भिवरी ) तसेच भालचंद्र उर्फ गणेश शरद पवार( रा. म्हाडा कॉलनी सासवड, सर्वजण ता. पुरंदर )आणि दोन अल्पवयीनांसह एकूण सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सदर आरोपी लातूरला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी व सहायक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे यांना मिळाल्यानंतर तपास पथकाने स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने लातूर बसस्थानक येथे सापळा रचुन आरोपींना ताब्यात घेतले.