Pune Breaking News Update: शहरात भर चौकात अश्लील वर्तन करणाऱ्या गौरव अहुजाला पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिस सकाळपासूनच त्याचा शोध घेत होते आणि शेवटी तो त्यांच्या ताब्यात आला आहे. पुण्यातून पळ काढलेल्या गौरव अहुजाला पोलिसांनी पकडून ताब्यात घेतले असून, लवकरच त्याला जवळच्या पोलीस ठाण्यात हजर केले जाईल आणि त्यानंतर पुण्यात नेण्यात येईल. उद्या त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी गौरव मनोज अहुजा हा गाडी चालवत होता, तर त्याचा साथीदार भाग्येश निबजीया ओसवाल शेजारी बसला होता. येरवडा पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला. त्यातील भाग्येश निबजीया ओसवाल याला काल सायंकाळी अटक करण्यात आली, तर मुख्य आरोपी गौरव अहुजाच्या शोधासाठी पोलीस सक्रिय होते.
दरम्यान, गौरव अहुजाने आपल्या कृत्याबाबत माफी मागतानाचा व्हिडिओ समोर आला. मात्र, पुणे पोलिसांनी त्याला साताऱ्यातून ताब्यात घेतले असून, त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. आता पुणे जिल्हा सत्र न्यायालयात त्याला किती वाजता हजर केले जाईल आणि यावर काय युक्तिवाद होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, गौरव अहुजाचा माफी मागतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. एका वृत्तवाहिनीने गौरवच्या माफीचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. व्हिडिओमध्ये तो म्हणतो, “नमस्कार, मी गौरव अहुजा, राहणार पुणे. माझ्याकडून सार्वजनिक ठिकाणी जे कृत्य घडले ते अत्यंत चुकीचे होते. त्यामुळे मी मनापासून माफी मागतो. संपूर्ण जनता, पोलीस विभाग आणि शिंदे साहेब यांची मी माफी मागतो. कृपया मला माफ करा आणि मला एक संधी द्या. तसेच, मी पुढील आठ तासांत येरवडा पोलिसांसमोर हजर होणार आहे. माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांना त्रास देऊ नका.” आता येरवडा पोलीस या प्रकरणात पुढील काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गौरव अहुजाच्या तपासासाठी पोलिसांनी मोठे जाळे टाकले होते. गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तो कराडमध्ये असल्याचे समजताच सातारा पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी विविध पथकांद्वारे सापळा रचला. अखेर गौरव आहुजा सातारा शहरातील पोलीस मुख्यालयाच्या परिसरात सापडला आणि पोलिसांनी त्याला अटक केली.गौरव सोशल मीडियावर सतत व्हिडिओ अपलोड करून पुणे आणि सातारा पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र, पोलिसांनी त्याचा माग काढत अखेर त्याला ताब्यात घेतले. सध्या अधिक चौकशीसाठी त्याला सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासमोर हजर करण्यात आले असून, सखोल तपासानंतर सातारा पोलीस त्याला पुणे पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.