Photo Credit- Social Media पुण्यातील मद्यधुंद तरुणाच्या वडिलांची पहिली प्रतिक्रीया
पुणे: पुण्यातील शास्त्रीनगर चौकात (पुणे नगर रोड) एका मद्यधुंद तरुण आणि त्याच्या मित्राने भरधाव गाडी चालवत महिलांसमोर अश्लील वर्तनामुळे संपूर्ण पुण्यातून संतापाची लाट उसळली आहे. जागतिक महिला दिनाच्या दिवशीच हा धक्कादायक प्रकार घडला आहे.या प्रकरणातील मद्यधुंद तरूणाची ओळख पटली असून त्याचे नाव गौरव अहुजा असे आहे. तर त्याच्या वडिलांचे नाव मनोज अहुजा आहे. या प्रकरणातील आरोपी तरूणाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तरूणाच्या वडिलांनी पहिल्यांदाच प्रतिक्रीया दिली आहे.
“तो माझा मुलगा आहे, याची मला लाज वाटते. या प्रकरणानंतर पोलिसांनी मला शास्त्रीनगर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावले आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी गाडी माझ्याच नावावर आहे. माझ्या मुलाने सिग्नलवर लघुशंका केली नाही, तर त्याने थेट माझ्या तोंडावर अपमानास्पद कृत्य केल्यासारखे वाटते,” अशा कठोर शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
Pune Crime: भर रस्त्यात BMW थांबवून लघूशंका; पुण्यात महिला दिनी मद्यधुंद तरुणांकडून अश्लील वर्तन
“माझ्या मुलाचे नाव गौरव मनोज अहुजा आहे, तर मी मनोज अहुजा. या घटनेमुळे मला अत्यंत लाजिरवाणे वाटत आहे. माझ्यावर जी काही कायदेशीर कारवाई होईल, ती मला पूर्णतः मान्य आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, तरुणाचा फोन सकाळपासून बंद आहे, आणि त्याच्या पालकांनीही त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या घटनेमुळे त्यांनी पोलिसांसमोरही खंत व्यक्त केली आहे.
येरवडा येथे घडलेल्या या घटनेबाबत संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अश्लील वर्तन करणे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेस अडथळा निर्माण करणे या आरोपांखाली त्याच्यावर गुन्हा दाखल केला जात आहे. येरवडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात येणार आहे. तरुणाचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली असून, त्याला ताब्यात घेतल्यानंतर वैद्यकीय तपासणी केली जाईल. त्यानंतर त्याने मद्यपान केले होते की नाही, हे स्पष्ट होईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिली.
शनिवारी सकाळी एका मद्यधुंद तरुणाला शास्त्रीनगर चौकात रस्त्यावर लघुशंका करताना नागरिकांनी अडवलं. मात्र, त्याने गाडीमध्ये बसून अडवणाऱ्या व्यक्तीला उद्देशून अश्लील हावभाव केले. त्यानंतर, गाडी भरधाव वेगात चालवत बेदरकारपणे पुढे गेला. दारू पिऊन गाडी चालवत असताना या तरुणाने आणि त्याच्या मित्राने महिलांसमोरही अश्लील वर्तन केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. चालक आणि त्याचा मित्र बीएमडब्ल्यू गाडीतून वाघोलीच्या दिशेने भरधाव वेगाने पसार झाले. दारूच्या नशेत असलेल्या या तरुणांकडून मोठा अपघात घडण्याची शक्यता होती, त्यामुळे शहरातील नागरिक अधिकच संतप्त झाले आहेत.