
Crime News: १६ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू; खोलीत आढळलेल्या चिठ्ठीने तपासाला नवी दिशा,अभ्यासाचा ताण की...
शनाया उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील गौर सिद्धार्थम सोसायटीत कुटुंबासह राहत होती. दहावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर तिच्यावर अभ्यासाचा दबाव असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, तिच्या मृत्यूमागे केवळ अभ्यासाचा ताण हेच कारण होते का, याबाबत पोलिसांनी अद्याप अंतिम निष्कर्ष काढलेला नाही. घटनेनंतर पोलिसांनी कुटुंबीय तसेच तिच्या परिचितांकडे चौकशी सुरू केली आहे. तिच्या दैनंदिन व्यवहाराबाबत, अभ्यासातील परिस्थिती आणि अलीकडील घडामोडींबाबत माहिती घेतली जात आहे. तसेच सोसायटीतील रहिवासी आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदविण्यात येत आहेत.
विजयनगर पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक धर्मपाल सिंह यांच्या माहितीनुसार, या प्रकरणाचा विविध अंगांनी तपास करण्यात येत आहे. विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांसह तिच्या संपर्कातील व्यक्तींचीही चौकशी केली जात आहे. तिच्या खोलीत आढळलेल्या चिठ्ठीसह इतर उपलब्ध पुरावे पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. फॉरेन्सिक तपासणी तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारे विद्यार्थिनीच्या मृत्यूमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अल्पवयीन मुलांवरील शैक्षणिक आणि परीक्षेच्या तणावाबाबत पालकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणात सर्व संभाव्य बाजू तपासल्या जात असून, तपासातून पुढे येणाऱ्या निष्कर्षानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.